नगर-पुणे रस्त्यावर अपघातात जखमी झालेल्या महिलेला सामाजिक कार्यकर्ते संदीप कुटे यांची मदत 

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): साधारण दुपारी 4:30 ची वेळ…अहमदनगर-पुणे महामार्गावरुन पुण्याकडे दुचाकीवर निघालेल एका दक्षिण भारतीय जोडप्याच्या जातेगावच्या घाटात अपघात झाला. त्यातील महिलेला डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर आजूबाजूला बघ्यांची गर्दी जमली. परंतु त्या जोडप्याला मदत करण्यासाठी मात्र त्या गर्दीतून कोणीही पुढे येईना. त्यावेळी रांजणगाव गणपती गावचे सामाजिक कार्यकर्ते संदीप कुटे हे नगरवरुन रांजणगावला जात असताना त्यांनी हा प्रकार पाहिला. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या गाडीत “त्या” जखमी महिलेला उपचारासाठी शिरुर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करत माणुसकीचे दर्शन घडवले आहे.

सविस्तर हकीकत पुढीलप्रमाणे शनिवार (दि 22) रोजी रांजणगाव गणपती येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच उद्योजक संदीप कुटे हे अहमदनगर येथे काही कामानिमित्त गेले होते. नगर येथील काम उरकल्यानंतर रांजणगावकडे परत येत असताना साधारण दुपारी 4:30 च्या दरम्यान सुप्याच्या पुढे नगर-पुणे महामार्गावर जातेगांव घाटात कुटे यांना लोकांची गर्दी दिसली. यावेळी कुटे यांनी गाडीच्या खाली उतरुन पाहिले असता साधारण 30 ते 35 वर्ष वय असलेल्या दक्षिण भारतीय जोडप्याचा अपघात झाला होता. त्यातील महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली होती.

परंतु बघ्यांची गर्दीत या जोडप्याला मदत करण्यासाठी कुणीही पुढे येत नव्हतं. अशा वेळेस त्या महिलेला वेळेवर उपचार मिळणं गरजेचं होत. त्यामुळे संदीप कुटे यांनी क्षणाचाही विलंब न करता तातडीने स्वतःच्या चारचाकी गाडीत या महिलेला बसवले आणि शिरुर येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. त्यामुळे त्या अपघातग्रस्त महिलेला वेळेवर उपचार मिळाले.