शिरुर येथे मराठा क्रांती मोर्चाच्या बंदला वेगवेगळ्या संघटना आणि पक्षांचा पाठिंबा

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) जालना येथे मराठा समाजाच्या आंदोलकावर झालेल्या लाठीमाराच्या घटनेच्या निषेधार्थ शिरुर येथील मराठा क्रांती मोर्चा शिरुर यांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या शिरुर शहर बंदला मोठ्या प्रतिसाद मिळाला. सोमवार (दि 11)रोजी संपुर्ण बाजारपेठेतील व्यवहार बंद होते. शिरुर बाजार समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासुन शिरुर तहसिल कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला .त्यात मराठा बांधवासह, इतर समाजातील विविध संस्था संघटना यांच्या कार्यकर्त्यानीही सहभाग घेतला .

 

शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास महिलांनी सकाळी 11 वाजता पुष्पहार घालुन या मोर्चाची सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, आरक्षण आमच्या हक्काचे, ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. शिरुर शहरातील जुन्या पुणे-नगर रस्त्यावरुन शिरुर बसस्थानका समोरुन शिरुर तहसिल कार्यलयावर मोर्चा नेण्यात आला.

 

यावेळी आखिल भारतीय मराठा महासंघाचे संभाजी कर्डिले ,रुपेश घाडगे, रमेश दसगुडे, सुनील जाधव, उमेश शेळके नितीन पाचर्णे, श्यामकांत वर्पे, सचिन जाधव, संजय बारवकर, प्रभाकर डेरे, प्रकाश थोरात , स्वप्नील रेड्डी, सुशांत कुटे, अविनाश जाधव, शोभना पाचंगे, जिजाबाई दुर्गे , वैशाली गायकवाड, शशिकला काळे, राणी कर्डिले, प्रियंका बंडगर, वैशाली ठुबे, श्रुतिका झांबरे, ज्योती हांडे, छाया हार्दे, सविता बोरुडे, प्रियंका धोत्रे, अविनाश घोगरे ,रावसाहेब चक्रे, अशोक भोसले, विविध राजकीय पक्ष, तसेच सामजिक संघटनाचे पदाधिकारी आदी मोर्चात सहभागी झाले होते .

 

मराठा समाज आपल्या आरक्षणाच्या मागणीसंदर्भात शांततामय व सनदशीर मार्गाने आंदोलन अनेक वर्षापासून करीत असुन लाखोच्या संख्येने समाजाचे मोर्चे निघाले. राजकीय पक्ष ही म्हणतात आरक्षण मिळाले पाहीजे पण आरक्षण मिळत नाही .मराठा समाजाची परिस्थिती लक्षात घेता तातडीने आरक्षण द्यावे व सरसकट सर्व मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावे अश्या भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केल्या .जालना येथील लाठीमारीच्या घटनेच्या निषेध करीत याप्रकरणी दोषीवर कारवाई करावी अशी मागणी केली .

 

मोर्चा तहसिल कार्यालयाच्या आवारात गेल्यानंतर मराठा सेवा संघाचे नामदेव घावटे, ज्येष्ठ नेते पांडुरंग थोरात आखिल भारतीय मराठा महासंघाच्या उर्मिला फलके ,अभिनेते दिग्दर्शक भाउराव क-हाडे , समस्त सकल मराठा समाज संघ घोडनदीचे प्रा.सतीश धुमाळ, श्रीराम सेनेचे उमेश शेळके, पोपटराव बो -हाडे, जैन समाजचे प्रकाश बाफना, शिरुर वकिल संघटनेचे ॲड प्रदीप बारवकर ,संगीता शेवाळे, शिवसेनेचे गणेश जामदार , शहरप्रमुख संजय देशमुख ,माजी नगरसेवक विनोद भालेराव, राजेंद्र कोरेकर, कॉग्रेस आयचे महेश ढमढेरे, शिवसेनेचे पोपट शेलार, राणी कर्डीले आदीची भाषणे झाली. यावेळी सूत्रसंचालन प्रकाश थोरात यांनी तर आभार सुनील जाधव , रुपेश घाडगे यांनी मानले .

 

मराठा क्रांती मोर्चा शिरुर यांच्या वतीने मागण्याचे निवेदन तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांना देण्यात आले. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की मराठा बांधव मनोज जरांडे यांनी केलेल्या मागण्या मान्य करण्यात याव्यात. संपूर्ण मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे. मराठा समाजाचे जेवढे आंदोलन व मोर्चे झाले त्यामध्ये मराठा समाज बांधव यांच्यावर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे.

 

दरम्यान बंद निमित्त शहरातील मुख्य बाजारपेठ तसेच उपनगरातील दुकाने ही बंद होती. मोर्चा व बंदच्या दरम्यान पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .