पाबळ (सुनील जिते): पानामध्ये मिसळून व्यसनासाठी वापरली जाणारी संशयित अपायकारक पावडर जप्त करत शिक्रापूर पोलिसांनी केंदूर (ता. शिरूर) येथील पऱ्हाडमळा परिसरात धडक कारवाई केली. या प्रकरणी तुषार राहुल पऱ्हाड (वय २६, रा. पऱ्हाडमळा, केंदूर) याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक अंकुश कारंडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने छापा टाकला. आरोपीच्या घरामागील पत्राशेडमध्ये ठेवलेल्या बॉक्समधून प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवलेली उग्र वासाची संशयित पावडर आढळून आली. ही पावडर पानामध्ये मिसळून व्यसनासाठी वापरली जात असल्याचा प्राथमिक संशय आहे.
फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या उपस्थितीत पंचनामा करून पावडरचे दोन नमुने रासायनिक विश्लेषणासाठी सीलबंद करण्यात आले. उर्वरित सुमारे ८५ ग्रॅम पावडर जप्त करण्यात आली. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त केलेला माल तपासासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे.आरोपीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, शिरूर यांच्या न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक अंकुश कारंडे, सोमनाथ कचरे, धनंजय थेऊरकर व विशाल देशमुख यांनी केली.
अवैध व्यसनाविरोधात कठोर कारवाई
“खायच्या पानामधून व्यसनास प्रवृत्त करणाऱ्या आणि मानवी आरोग्याशी खेळ करणाऱ्या अवैध प्रकारांवर तातडीने कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी अशा प्रकारांची माहिती पोलिसांना निर्भयपणे द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल.”
चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, शिक्रापूर पोलीस ठाणे