शिरुर तालुक्यात मतीमंद विद्यार्थ्यास मारहाण

क्राईम शिरूर तालुका

विद्यालयातील महिला शिक्षिकेच्या पतीवर गुन्हे दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतीमंद निवासी विद्यालय मध्ये शिकणाऱ्या मुलाला शिक्षिकेच्या पतीने मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दिगांबर मधुकर बावनेर याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतीमंद निवासी विद्यालय मध्ये अनेक मतीमंद विद्यार्थी शिक्षण घेत असून २४ मार्च रोजी विद्यालातील शिक्षिका वनिता बावनेर यांचे पती दिगांबर बावनेर विद्यालयात आले. दरम्यान विद्यार्थ्यांच्या वर्गात जाऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करत वरील मजल्यावर विद्यालयाच्या अधिक्षिकांच्या ऑफिस मध्ये जाऊन बडबड केली.

त्यानंतर पुन्हा विद्यार्थ्यांच्या वर्गात येऊन सुरज पवार या सोळा वर्षीय विद्यार्थ्याला दमदाटी करत अविनाश शर्मा या 15 वर्षीय मुलाला डोक्यात मारहाण केली. यावेळी या वर्गात असलेले विद्यालयाचे कर्मचारी महादेव नाचण यांना देखील तूझे जे काम आहे ते काम कर, असे बोलून दमदाटी करत दिगांबर बावनेर निघून गेले.

याबाबत महादेव विष्णू नाचण (वय ३५) रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. आखेगाव ता. शेवगाव जि. अहमदनगर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी दिगांबर मधुकर बावनेर रा. पेरणे फाटा ता. हवेली जि. पुणे याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ शिंदे हे करत आहे.