करंदीचे विद्यार्थी पोहचले अहमदाबादच्या इस्रोला

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील आयव्हीज् इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच अहमदाबाद येथील इस्रो सेंटरला भेट देत विक्रम साराभाई अंतरीक्ष प्रदर्शनीची माहिती घेत येथील विविध प्रकल्पांची पाहणी केली असल्याची माहिती मुख्याध्यापिका राणी ढोकले यांनी दिली आहे.

करंदी (ता. शिरुर) येथील आयव्हीज् इंटरनॅशनल स्कूल मध्ये शालेय मुलांना वेगळे काही शिकवण्याचा प्रयत्न केला जात असताना शाळेच्या प्रयत्नातूनच शाळेतील राजवर्धन ढोकले, अनन्या श्रीवास्तव, चैतन्या काळे व शिवराज बिबावे या विद्यार्थ्यांनी अहमदाबाद येथे असलेल्या मोठ्या विक्रम साराभाई अंतरिक्ष प्रदर्शनी या इस्त्रो सेंटरला भेट देत सॅटेलाईट व रोबोट्स बद्दल माहिती जाणून घेत विद्यार्थ्यांनी रोबोट्स बद्दल माहिती घेऊन रोबोटचे सर्व मॉडेल आणि त्याची कार्यपद्धती जाणून घेतली.

तसेच यावेळी येथील कांकरिया पार्क, निशाचर प्राणी संग्रहालयची पाहणी करत वेगवेगळ्या प्राण्यांचीबद्दल माहिती घेतली. मुलांना भविष्यात पुढे जाताना या गोष्टीचा खूप फायदा होणार असून मुलांचा शिक्षणाबद्दलचा दृष्टिकोन बदलत असताना शिक्षण पद्धतीमध्ये असे प्रयोग नेहमी होणे गरजेचे असल्याचे देखील याबाबत बोलताना मुख्याध्यापिका राणी ढोकले यांनी सांगितले.

अहमदाबाद येथे विद्यार्थ्यांची एका दिवसाची औद्योगिक क्षेत्रात भेट घडवून आणून वस्तूंचे होणारे पॅकेजिंग कशा पद्धतीने होते याची सुद्धा माहिती मुलांना देण्यात आली, तर जगात पुढे जाण्यासाठी या सर्व गोष्टी आत्मसात करण्याची गरज आहे तसेच ग्रामीण भागातील मुलांना भविष्यात अशा संधी उपलब्ध करुन देणे गरजेचे असल्याचे देखील मुख्याध्यापिका राणी ढोकले यांनी सांगितले.