शिरुर तालुक्यात पदाधिकारी झाले उदंड मात्र सर्वसामान्य लोकांच्या समस्या “जैसे थे”

राजकीय शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) राज्यात काही दिवसांपुर्वी मोठा राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंची साथ सोडत भाजपा सोबत सत्ता स्थापन करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर काही दिवसातच अजित पवार शरद पवारांची साथ सोडुन भाजपा सोबत गेले आणि त्यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा सगळा गोंधळ चालु असताना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सत्तेसाठी उभी फूट पडली. त्याचा परिणाम आख्या राज्यात झाला.

 

काही दिवसानंतर येऊ घातलेल्या लोकसभा, विधानसभा, नगरपालिका तसेच पुढील सर्वच निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर शिरुर तालुक्यात सगळ्याच पक्षांनी आपापले समर्थक असलेल्या असलेल्या कार्यकर्त्यांना वेगवेगळी पदे वाटण्याचा सपाटाचा लावला असुन पक्षाची पदे हि सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी आहेत की फक्त फ्लेस लावण्यापुरतीच आहेत असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

 

शिरुर तालुक्यात शिवसेना (उद्धव ठाकरे गट), शिवसेना (एकनाथ शिंदे गट) राष्ट्रवादी (शरद पवार गट) राष्ट्रवादी (अजित पवार गट) तसेच भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित आघाडी, काँग्रेस तसेच अनेक पक्षांचे कार्यकर्ते आहेत. परंतु हे सर्वपक्षीय कार्यकर्ते सर्वसामान्य लोकांच्या किती समस्या सोडवतात हा मात्र संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे मिळालेली राजकीय पद नेमकी कशासाठी आहेत असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे.

 

कार्यकर्ते उदंड पण समस्या मात्र “जैसे थे”

शिरुर तालुक्यात भुमी अभिलेख खात्यात सध्या मोठा सावळा गोंधळ चालु असुन सर्व सामान्य व्यक्तीला एका कामासाठी कमीत कमी 5 ते 10 चकरा माराव्या लागतात. तसेच अनेक राजकीय नेत्यांचे प्लॉटिंगचे व्यवसाय असल्याने “चिरीमिरी” देऊन त्यांची काम पटकन होतात. परंतु सर्वसामान्य लोकांना मात्र “तारीख पे तारीख” दिली जाते. त्यामुळे “सारा गाव मामाचा पण एक बी नाय कामाचा” या म्हणीचा प्रत्यय सर्वसामान्य लोकांना येत आहे.

 

सर्वसामान्य लोकांना न्याय कधी…?

शिरुर तालुक्यात तहसीलदार कार्यालय, पोलिस स्टेशन, पंचायत समिती येथे सर्वसामान्य लोकांना स्वतःच्या कामासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागतात. परंतु त्यांना काही ना काही कारण पुढे करुत काम करण्यास टाळाटाळ केली जाते. मग शिरुर तालुक्यात वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची एवढी गर्दी असताना सर्वसामान्य लोकांची कामे मार्गी का…? लागत नाही असा प्रश्न विचारला जात आहे. सध्या प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या कार्यकर्त्यांना पदाची खिरापत वाटत असुन हि पद फक्त फ्लेसवर फोटो लावण्यासाठीच आहेत कां असा सुर सर्वत्र निघत आहे.