कान्हूर मेसाईत राष्ट्रीय पक्षी मोराला जीवदान

शिरूर तालुका

पोलीसांसह वनविभाग व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेची कामगिरी

शिक्रापूर: कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील मळई लवण येथे शेतात आढळून आलेल्या जखमी मोराला शिक्रापूर पोलिसांच्या सतर्कतेने वनविभाग व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जीवदान देण्यात यश आले आहे.

कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील मळई लवण येथे मारुती पुंडे हे शेतात गेले असता त्यांना एक मोर जखमी अवस्थेत पडल्याचे दिसल्याने त्यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशनचे किशोर शिवणकर व विशाल देशमुख यांना माहिती दिली. त्यांनी याबाबतची माहिती निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख यांना देताच शेरखान शेख व अमोल कुसाळकर यांनी सदर ठिकाणी धाव घेत शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, वनपाल गणेश पवार, वनरक्षक ऋषिकेश लाड, अभिजित सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोराला ताब्यात घेतले.

यावेळी परशुराम पुंडे, मारुती पुंडे, अनिल तांबे हे उपस्थित होते. दरम्यान सदर मोराला तळेगाव ढमढेरे पशुवैद्यकीय रुग्णालयात पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रदीप खंडाळे यांच्या माध्यमातून उपचार करण्यात आले असून मोराची प्रकृती पूर्णपणे स्थिर असल्याचे डॉ. प्रदीप खंडाळे यांनी सांगितले आहे.