कारेगाव येथे पुणे-नगर महामार्गाच्या कडेला असणाऱ्या गटारलाईनचे काम धिम्या गतीने

मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके): कारेगाव (ता. शिरुर) येथे पुणे-नगर महामार्गाच्या लगतच पाणी साठल्याने रस्त्याला मोठया प्रमाणात खड्डे पडत असल्याने सार्वजनिक बांधकामं विभागाच्या वतीने कारेगाव कडुन शिरुरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूच्या गटार लाईनच काम चालू असुन महिन्यापुर्वी या रस्त्याच्या लगतच मोठे मोठे खड्डे उरकुन ठेवले असुन गटार लाईनच काम धिम्या गतीने चालू असल्याने येथील व्यावसायिकांना त्याचा मोठया प्रमाणात फटका बसत आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पुर्ण करावे अशी मागणी येथील दुकानदारांनी केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासुन कारेगाव येथील मुख्य चौकात पावसाचे पाणी साठल्याने रस्त्याला मोठया प्रमाणात खड्डे पडत होते. कारेगाव कडुन शिरुरला जाणाऱ्या रस्त्यावर रस्त्याच्या लगतच अनेक दुकानें असुन या दुकानांपुढे संबंधित दुकानदारांनी मुरुम टाकल्याने त्या ठिकाणी चढ झाल्याने पावसाचे पाणी वाहून मुख्य चौकात येऊन साठत असल्याने त्याठिकाणी रस्त्यावर मोठया प्रमाणात खड्डे पडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने या ठिकाणी काही अंतर गटार लाईन करण्याचे ठरवले.

मागच्या महिन्यात या कामाची निविदा प्रसिद्ध होऊन काम प्रत्यक्षात सुरुही झाले. महिन्यापुर्वी संबंधित ठेकेदाराने रस्त्याच्या लगतच गटारलाईनसाठी मोठे मोठे खड्डे उकरले. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुकानदारांचा रस्ता पूर्णपणे बंद झाला असुन दुकानात जाण्यासाठी त्यांना धोकादायक पद्धतीने लाकडी फळ्या तसेच इतर साधनाचा वापर करावा लागत आहे. गेले महिनाभर दुकानदार आणि ग्राहक यांना मोठया प्रमाणात जीव धोक्यात घालून लाकडी फळ्यावरुन ये-जा करावी लागत असल्याने गटार लाईनचे काम लवकरात लवकर पुर्ण करावे अशी मागणी दुकानदार आणि ग्राहकांनी केली आहे.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे शेळके यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले रस्त्याच्या लगतच असणाऱ्या दुकानदारांनी स्वतःच्या दुकानासमोर मुरुम टाकल्याने चढ झाल्याने सगळं पावसाचं पाणी थेट कारेगावच्या मुख्य चौकात रस्त्यावर येऊन साठत असल्याने रस्त्यावर खड्डे पडुन गंभीर अपघात झालेले आहेत. त्यामुळे आम्ही रस्त्याच्या लगतच गटार लाईन करुन हे पाणी नैसर्गिक ओढ्यात सोडणार आहोत. हे काम लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला सुचना देणार असुन हे काम पुर्ण झाल्यानंतर या रस्त्याची उंचीही वाढविण्यात येणार आहे.