pune-rural-police

शिरूर तालुक्यात पेट्रोल टाकून प्रेत जाळणारे गजाआड; प्रेमसंबंधातून खून…

मुख्य बातम्या

पुणे (तेजस फडके): शिरूर तालुक्यात खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने पेट्रोल टाकून प्रेत जाळणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व शिकापूर पोलिस पाच दिवसांमध्ये गजाआड केले आहे. वेबसिरिज पाहून खून करण्याची आयडिया आल्याचे आरोपीनी पोलिस तपासात सांगितले. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

दिनांक ०१/०६/ २०२३ रोजी सकाळी ०७.३० वाजणेचे पुर्वी शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीतील सणसवाडी (ता. शिरूर, जि. पुणे) येथे पुणे-अहमदनगर हायवे रोड लगत गवारे यांचे एच.पी. पेट्रोल पंपाजवळ जितेंद्र बाबू ललवाणी यांचे प्लॉटींग लगत अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून एका अनोळखी पुरूष जातीच्या व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्याचे हेतूने प्रेत पेट्रोल टाकून जाळून टाकले होते. यामध्ये यातील मृतदेह हा पुर्णतः जळालेला असल्याने त्याची ओळख पटवणे अवघड होते. सदर बाबत शिकापूर पोलिस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा रजि नं ५२० / २०२३ भादविकाक ३०२,२०१ प्रमाणे दाखल करणेत आला होता.

सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापुर परीक्षेत्र सुनिल फुलारी, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकीत गोयल, अपर पोलिस अधीक्षक पुणे विभाग मितेश घट्टे यांनी सदर गुन्हा उघडकीस आणणे बाबत योग्य त्या महत्वाच्या सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सदर गुन्हयाचे तपासा बाबत श्री अविनाश शिळमकर पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण व प्रमोद क्षिरसागर पोलिस निरीक्षक शिकापूर यांचे नियंत्रणाखाली दोन तपास पथके तयार करून सदर गुन्हयाचा तपास सुरू करणेत आला होता.

आरोपी पत्नीला अटक

नमुद पथकामार्फत तपास करीत असताना शिकापूर पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी सुमारे २३० सीसीटीव्ही कॅमेरे शिक्रापूर ते चंदननगर वडगाव शेरी पुणे असे सलग चार दिवस रात्र पाहून गुन्हयात वॅगनआर कारचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. सदरचे वाहन हे वडगाव शेरी परीसरातील असून सदरची गाडी जॉय कसबे (रा. साईकृपा सोसायटी वडगाव शेरी पुणे) हा वापरत असल्याची माहिती बातमीदारा कडून समजली. त्या अनुषंगाने त्याचे कडे चौकशी केली असता, ३१/०५/२०२३ रोजी त्याचेकडील वॅगनआर कार ने एम.एच. १२ सी.के. ३१७७ ही त्याचा मुलगा अॅग्नेल जॉय कसबे हा घेवून गेला असल्याचे सांगितले. त्यामुळे
१) अॅग्नेल जॉय कसबे (वय २३ वर्षे, रा. साईकृपा सोसायटी वडगाव शेरी पुणे) याला ताब्यात घेवून त्याचे कडे चौकशी करता त्याने
२) सौ. सॅन्ड्रा जॉन्सन लोबो (वय ४३ वर्षे, रा. रा. ए १६, तिसरा मजला गुडविल वृंदावन आनंदपार्क वडगाव शेरी पुणे)
३) एक विधीसंघर्षीत बालिका यांनी संगणमताने सदरचा गुन्हा केल्याचे सांगितले. तसेच मयत व्यक्तीचे नाव जॉन्सन कॅजीटन लोबो (वय ४९ वर्षे, रा. ए १६, तिसरा मजला गुडविल वृंदावन आनंद पार्क वडगाव शेरी पुणे) असे असल्याचे सागितले.

आरोपी अँग्नेल कसबे याचे विधीसंघर्षीत बालिका हिचेसोबत प्रेमसंबंध होते. विधीसंघर्षीत बालिका ही आरोपी सॅन्ड्रा लोबो व मयत यांची मुलगी आहे. त्यांच्या या प्रेमसंबंधाला आरोपी सॅन्ड्रा लोबो हिची संमती होती, परंतु मयत यांचा विरोध होता. त्यामुळे आरोपी सॅन्ड्रा लोबो व मयत जॉन्सन लोबो यांचेत वाद होत होते. मयतास कायमचा दूर करणेच्या उद्देशाने वेगवेळया क्राईम वेब सिरीज पाहून कट रचला आणि वरील आरोपींनी संगणमत करून मयत जॉन्सन कॅजीटन लोबो याचा ३०/०५/२०२३ रोजी रात्रीचे वेळी त्याचे घरातच डोक्यात वरवंटयाने मारून तसेच मानेवर चाकूने वार करून खून केला. त्यानंतर मयत प्रेत घरातच ठेवले आणि मयताची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करणेचे हेतूने ३१/५/ २०२३ रोजी रात्रीचे वेळी मयतास वॅगनआर कारमध्ये टाकून सणसवाडी जवळील एचपी पेट्रोल पंपाचे अलीकडे पुणे ते अहमदनगर हायवे रोडलगत कार थांबवून मयतास हायवे रोडलगतचे नाल्यात टाकून त्याचेवर पेट्रोल टाकून त्यास पेटवून दिल्याचे सांगितले.

आरोपी क्रमांक २ ही मयताची पत्नी असून खून केल्या नंतर नातेवाईकांना व शेजारी यांना समजू नये म्हणून त्यांनी मयताचा फोन चालूच ठेवून त्यावरून रोज व्हॉटसअप स्टेटस ठेवणे सुरू केले होते. आरोपी क्रमांक २ म्हणजे मयताची पत्नी हीचा वाढदिवस दि. ४/६/२०२३ रोजी असल्याने आरोपी अनेक कसबे याने मयताचे मोबाईल वरून पत्नीचे वाढदिवसाचे स्टेटस ठेवले जेणेकरून मयत हा जिवंत आहे असे, दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गुन्हा लपवून तपास यंत्रणेची तसेच नातेवाईकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचा बारकाईने तपास करून गुन्हा उमडकीस आणलेला असून आरोपींना ०५/०६/ २०२३ रोजी अटक करणेत आली आहे. न्यायालयाने त्यांची पोलिस कानडी रिमांड मंजूर केलेली आहे.

सदरचा गुन्हा हा पोलिस अधीक्षक अंकीत गोयल, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, उप विभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी, शिरूर विभाग, उप विभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल जाधव, दौंड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश शिळीमकर, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा पुणे ग्रामीण प्रमोद क्षिरसागर, शिकापूर पोलिस स्टेशन वैभव पवार, महादेव शेलार, नितीन अतकरे, सहा. पोलिस निरीक्षक, गणेश जगदाळे, अभिजीत सावंत, अमोल खटावकर पोलिस उप निरीक्षक, सहा. फौज तुषार पंदारे, जितेंद्र मानसरे, मोहवा जनार्दन मोकळके, राजू मोमीन, योगेश नागरगोजे, अमोल दांडगे, श्रीमंत होनमाने, पोलिस नाईक विकास पाटील, शिवाजी चितारे, निखील गवई, किशोर शिवनकर, मुकुंद कदम यांनी उघडकीस आणलेला असून सदर गुन्हयाचा तपास प्रमोद क्षिरसागर पोलिस निरीक्षक पोहवा सचिन होळकर, चंद्रकांत काळे शिकापूर पोलिस स्टेशन हे करीत आहेत.