त्यांच्या संवेदनशील पणामुळे वाचला “कबुतराचा” जीव

मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके): आजच्या धावपळीच्या युगात रस्त्यावर एखादा गंभीर अपघात झाला तर बघ्यांची गर्दी होते. ज्याचा अपघात झालाय त्याचा जीव वाचविण्यापेक्षा मोबाईल मध्ये फोटो काढणाऱ्यांचीच संख्या जास्त असते. जिथं माणसाची हि अवस्था तिथं प्राणी, पक्षी यांचा कोण विचार करतो…? परंतु महावितरणच्या एका संवेदनशील कर्मचाऱ्यामुळे शिरूर तालुक्यातील १७ गावांचा विद्युत पुरवठा तात्पुरता बंद करून विद्युत खांबावर तारेला अडकलेल्या एका कबुतराचा जीव वाचविण्यात यश आले आहे.

hotel matoshree ranjangaon ganpati
hotel matoshree ranjangaon ganpati

रांजणगाव गणपती येथील संतोष लांडे हे कारेगाव येथे महावितरणमध्ये काम करतात. कारेगाव येथील यश इन चौकालगतच असणाऱ्या एका विजेच्या खांबांवर एक कबुतर चिकटले असून ते तडफडत असल्याचा स्थानिक कार्यकर्ते दादा नवले यांचा फोन वीज कर्मचारी संतोष लांडे यांना आला. त्यांनी तातडीने त्याची दखल घेत घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी मुख्य विद्युत वाहिनीवर कबुतर चिकटले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यासाठी या वाहिनीवरून पुरवठा होणाऱ्या १७ गावांचा विद्युत पुरवठा काही वेळेसाठी खंडित करणे गरजेचे होते. लांडे यांनी तात्काळ सहाय्यक अभियंता दीपक पाचुंदकर यांच्या परवानगीने विद्युत पुरवठा खंडित केला व कर्मचारी सुयोग आफळे यांच्या मदतीने कबुतराचा जीव वाचविला.

त्या कबुतराच्या पायाला किरकोळ जखम झालेली होती. काही वेळाने हे कबुतर निसर्गाच्या सान्निध्यात सोडून देण्यात आले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या या तत्परतेने एका कबुतरांचा जीव वाचला त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर रांजणगाव-कारेगाव परीसरातून सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.