grampanchayat

ग्रामपंचायत बांधायला दिड कोटी आहेत पण चौकाच्या नामांतरासाठी दिड लाख नाहीत का…?

मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती ग्रामपंचायतच्या नुतन इमारत उदघाटन कार्यक्रमावर माजी उपसरपंचासह अनेकांचा बहिष्कार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील महत्वाची ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या रांजणगाव गणपती येथील दिड कोटी खर्चून बांधलेल्या नुतन ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीचे उदघाटन राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवार (दि 13) रोजी सकाळी 11 वाजता होणार असुन या कार्यक्रमावर सत्ताधारी गटातीलच माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राहुल पवार यांच्यासह अनेक शिवभक्तांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत नाराजी व्यक्त केली असुन त्यामुळे हा उदघाटन सोहळा वादात सापडण्याची शक्यता आहे.

रांजणगाव MIDC त प्रवेश करणाऱ्या मुख्य चौकाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्यावे तसेच या चौकाचे सुशोभीकरन करावे असा रांजणगाव गणपती ग्रामसभेचा 26 जानेवारी 2019 रोजी ठराव करण्यात आला होता. त्यावेळेस ग्रामपंचायत सदस्य राहुल पवार हे उपसरपंच होते. या सुशोभीकरणासाठी अंदाजे दिड लाख रुपये खर्च अपेक्षित होता. सदर ठरावाचा पाठपुरावा स्वतः राहुल पवार हे करत होते. त्यावेळी तत्कालीन गाव पुढाऱ्यांनी आपण “त्या” चौकाचे नामकरण आणि सुशोभीकरण लवकरच करु असे आश्वासन दिले होते. परंतु त्या चौकाच्या नामांतरासाठी वेळोवेळी ग्रामपंचायत सदस्य आणि माजी उपसरपंच राहुल पवार यांनी पाठपुरावा केला असता. प्रत्येक वेळी त्यांना ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडुन वेगवेगळी उत्तरे मिळत गेली.

याबाबत गावातील कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी ठोस पावले उचलली नाहीत. त्यानंतर गेल्या सहा महिन्यापुर्वी ग्रामपंचायतला पुन्हा पवार यांनी विचारणा केली असता त्यांना ग्रामपंचायत इमारतीच्या उदघाटनाच्या आधी “त्या” चौकाचे नामांतर आणि सुशोभीकरन करु असे उत्तर देण्यात आले. परंतु त्या चौकाच्या सुशोभीकरणाबाबत कोणताही निर्णय न घेता ग्रामपंचायत कार्यालय बांधून पुर्ण झाले तसेच त्याचे उदघाट कार्यक्रम सुद्धा निश्चित करण्यात आला. त्यामुळे छत्रपतींच्या नावाचा वापर फक्त राजकारणासाठीच केला जातो यांची खंत वाटते अशी प्रतिक्रिया शिवभक्तांनी व्यक्त केली. तसेच ग्रामपंचायत इमारत बांधायला ग्रामपंचायतकडे दिड कोटी रुपये आहेत. परंतु MIDC त जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देऊन सुशोभीकरण करण्यासाठी पैसे नसल्याने माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत राहुल पवार यांच्यासह श्रीमंतयोगी प्रतिष्ठानच्या अनेक शिवभक्तांनी या कार्यक्रमाला विरोध करत बहिष्कार टाकला आहे.

गावातील काही राजकीय पुढाऱ्यांनी माझ्याबाबत गैरसमज पसरवत मी निमंत्रण पत्रिकेत नाव खाली टाकल्याने नाराज असल्याबाबत अफवा पसरविल्या आहेत. परंतु मला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावासाठी मी ग्रामपंचायतकडे वारंवार पाठपुरावा करुनही त्यांनी मला कोणताही प्रतिसाद दिला नसल्याने मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.

राहुल पवार

(विद्यमान ग्रामपंचायत सदस्य)