कारेगाव येथील वेश्या व्यवसायावरील कारवाई नंतर सगळीकडे एकच चर्चा ‘गंगाधर हि शक्तीमान है’

मुख्य बातम्या शिरूर तालुका

कारेगाव (तेजस फडके) पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या पथकातील दर्शन दुगड (I.P.S) यांनी साध्या वेशामध्ये पुणे-नगर महामार्गावरील हॉटेल तसेच लॉजेस मध्ये चालणा-या अवैध धंद्यांबाबत माहिती काढत असतांना दि. 22 फेब्रुवारी 2024 रोजी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील कारेगाव येथील एका तीन मजली इमारतीमधील खोलीमध्ये चालु असलेल्या वेश्याव्यवसायावर कारवाई केली असुन या कारवाईमुळे अनेक गंभीर बाबी पुढे आल्या आहेत.

 

रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीत गेल्या दोन वर्षांपासुन यश इन चौकात पुणे-नगर महामार्गाच्या कडेला असणाऱ्या एका बिल्डिंगमध्ये राजरोसपणे हा वेश्याव्यवसाय चालु होता. त्यातून हा वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या बबलु दुखबंधु साहु (वय 40) सध्या रा. कारेगाव, ता.शिरुर, जि.पुणे. मुळ (रा. तालचर, ता.जि. डेकालाल, उडीसा) याला एका महिन्याला लाखों रुपयांचे उत्पन्न मिळत होते. तसेच या व्यवसायातून त्याने लाखों रुपयांची ‘माया’ गोळा केली असुन कारेगाव मध्ये याच व्यवसायाच्या जोरावर काही गुंठे जागाही घेतल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

विशेष म्हणजे बबलु साहु याचा रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे सतत वावर असायचा. पोलिस स्टेशनला येणाऱ्या सर्व नवीन अधिकाऱ्यांच्या स्वागताला बबलू साहू हजर असायचा. त्यामुळे गेल्या दोन वर्षात यश इन चौकात पुणे-नगर महामार्गाच्या कडेला चालु असलेल्या वेश्याव्यवसायावर एखादा अपवाद वगळता कधीच कारवाई झाली नाही.

 

परंतु पुणे ग्रामीणचा कार्यभार पंकज देशमुख यांनी स्वीकारताच बबलू साहू ने हा वेश्या व्यवसाय कारेगाव येथील यश इन चौकातुन हलवला आणि तिथुन अर्धा किलोमीटर अंतरावर एका तीन मजली इमारतीमधील काही खोल्या भाड्याने घेऊन हा वेश्या व्यवसाय चालुच ठेवला. त्यामुळे कोणाच्या आशिर्वादाने हा सगळा गैरप्रकार चालत होता याचा तपास पोलिस अधीक्षकांनी करावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेने केली आहे. कारण रांजणगाव पोलिस स्टेशन मधील “गंगाधर हि शक्तीमान है” अशी सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

 

तसेच एका स्वयंघोषित महिला सामाजिक कार्यकर्तीचाही या व्यवसायात सहभाग असण्याची शक्यता असुन ‘वेश्या’ व्यवसायाबाबत तक्रार केल्यास तक्रारदारांना संबंधित महिला फोन करुन दबाव आणत असल्याचेही निदर्शनास आले आहे. वेश्या व्यवसायाबाबत तक्रार करणाऱ्या व्यक्तीस फोन करुन तक्रार न करण्याबाबत संबंधित महिला दबाब आणत असल्याचे कॉल रेकॉर्डिंगही “शिरुर तालुका डॉट कॉम” च्या हाती लागले आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे आणखीन बरेच खुलासे होण्याची शक्यता आहे.

शिरुर तालुक्यात वेश्या व्यवसाय करणा-या तिघांविरुध्द गुन्हा दाखल; पोलिसांनी केली एका महिलेची सुटका

शिरुर तालुक्यात गुन्हेगारी वाढल्याने कायदा व सुव्यवस्था धोक्यात…? पोलिस सिंघमगिरी दाखवणार का…?

पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या धडाकेबाज कारवाईची सगळीकडे जोरदार चर्चा

पुणे ग्रामीण पोलिस दलात कार्यकाळ पुर्ण होऊनही ठाण मांडून बसलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या कधी