शिरुर तालुक्यात कार्यकर्ते संभ्रमात, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती अशी अवस्था 

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड उलथा-पालथ चालु असताना शिरुर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी “वेट अँड वॉच” ची भुमिका ठेवली आहे. शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार हे सुरवातीला अजित पवार यांच्या सोबत होते. मात्र शपथविधी नंतर त्यांनी सावध पवित्रा घेत पुन्हा आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे त्यांनी जाहीर केले. मात्र बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी वळसे पाटील यांच्या सोबत जाण्याची भूमिका घेतल्याने तालुक्यातील जनतेच्या भुवया उंचावल्या आहेत.

शिरुर तालुक्यात मागील काही वर्षात जो विकास झाला त्याचे श्रेय खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाच जात असे जुने जाणते सांगत असुन माजी आमदार पोपटराव गावडे हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक आहेत. काही वर्षांपुर्वी गावडे यांच्या वाढदिवसाला पवार यांनी हजेरी लावली होती. त्या वेळी आम्ही पवार साहेब यांचे निष्ठावंत असल्याचे गावडे यांनी जाहीर सभेत ठणकावून सांगितले होते. परंतु सध्या शरद पवार यांच्यापेक्षा दिलीप वळसे पाटील यांचे नेतृत्व स्वीकारून तेच बेट भागाचा विकास करु शकतात असा गावडेनां साक्षात्कार झाल्यामुळेच गावडे यांच्या राजकारणातील पंढरीचा विठ्ठल असलेले शरद पवार यांची साथ सोडत गावडे यांनी अजित पवार गटाची वाट धरल्याचे बोलले जात आहे.

सध्या शिरुर तालुक्यातील राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते अशोक पवार यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्यामुळे त्यांनी जिजामाता बँकेच्या निवडणुकीत उघडपणे अशोक पवार यांच्या विरोधात प्रचार यंत्रणा राबवत बँकेच्या निवडणुकीत पवार यांच्या पॅनलचा पराभव केला. सध्या राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याने आधी अशोक पवार अजित पवार यांच्या गटात सामील झाल्यावर राष्ट्रवादीच्या नाराज कार्यकर्त्यांना कुठंतरी आशेचा एक किरण दिसत होता. परंतु अशोक पवार यांनी “यु टर्न” घेतल्याने काही कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे सध्या राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते “वेट अँड वॉच” च्या भूमिकेत आहेत.

विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती…

महाराष्ट्रात आधी शिवसेनेत फूट पडल्याने उद्धव ठाकरे समर्थक आणि एकनाथ शिंदे समर्थक यांचे दोन गट पडले. आता राष्ट्रवादीत फूट पडल्याने शरद पवार समर्थक आणि अजित पवार समर्थक असे दोन गट पडल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आता नेमकी कोणाची साथ द्यावी असा प्रश्न पडला असुन ज्या शिवसेनेला गेले अनेक वर्षे विरोध केला. त्यांच्यासोबत आधी जुळवून घ्यावं लागलं. आणि आता ज्या भाजपावर टिका केली त्यांच्यासोबत सुद्धा जुळवून घ्यावं लागल्याने कार्यकर्त्यांची अवस्था “विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती” अशीच झाली आहे.