ग्रामीण भागातील नागरिकांच्या गळ्याला सावकारीचा फास

शिरूर तालुका

कोरोनातून वाचून सावकारीत अडकल्याची नागरिकांची अवस्था

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आलेले असताना सध्या अनेक ठिकाणी नागरिक सावकाराच्या जाळ्यात अडकून मोठ्या संकटात सापडल्याची स्थिती निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या गळ्याला सावकारीचा फास आवळल्याचे दिसून येत आहे.

शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी वारंवार बेकायदेशीर सावकारीच्या घटना घडत असून काही ठिकाणी सावकारीचे प्रकार विकोपाला गेल्याचे देखील दिसून येत आहे. तालुक्यात काही ठिकाणी सावकारांनी नागरिकांना बेकायदेशीरपणे व्याजाने दिलेल्या पैशांसाठी नागरिकांच्या जमिनी, घरे देखील नावावर करुन घेतली आहेत, तर काही ठिकाणी जमिनी, घरे, व्यावसायी गाळे नावावर करुन घेत परस्पर विक्री केल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. तर यापूर्वी सावकारांबाबतच्या काही तक्रारी थेट मंत्रालयात पोहोचल्याच्या घटना घडल्या आहेत.

बेकायदेशीरपणे व्याजाने पैसे देत सावकारी करणाऱ्यांमध्ये काही अधिकाऱ्यांचा देखील समावेश यापूर्वी उघड झालेला आहे, काही ठिकाणी सावकारांनी नागरिकांचे कोरे मुद्रांक, कोरे चेक लिहून घेऊन अनेक बेकायदेशीर व्यवहार केल्याचे निदर्शनास आलेले आहे. दिलेल्या रकमेपेक्षा 5 पट पैसे वसूल करण्यात येत असल्यामुळे कमी कालावधीत जास्त फायदा होत असल्याने अनेकजन याकडे आकर्षित होते असून नागरिकांना वेगवेगळे आमिष तसेच धाक सदर बेकायदेशीर सावकार दाखवत असल्यामुळे नागरिक देखील धास्तावत आहेत.

परंतु वारंवार अशा घटना घडत असताना काहींनी सावकरांच्या जाचाने नागरिकांना जीव देखील गमवावा लागल्याच्या घटना घडल्या असताना आणि मोठ्या प्रमाणात गुन्हे देखील दाखल होत असताना प्रशासनाचा यावर वचक आहे कि नाही असा सवाल नागरिकांना पडला आहे.

सावकारांची दमबाजी व दडपशाही…

सावकार हे नागरिकांना पैशासाठी काहीही कर, जमीन विक, गाडी विक, बायकोचे दागिने विक, सालाने रहा, मात्र माझे पैसे दे, तू कोणाकडे गेला तरी काही फायदा होणार नाही, माझी खूप लांब ओळख आहे, माझे काही होणार नाही अशी धमकी देत नागरिकांना दमबाजी करत नागरिकांच्या काही वस्तू देखील जप्त करुन नागरिकांना दडपशाही करत आहे.

सावकारांची गय नाही: यशवंत गवारी उपविभागीय पोलीस अधिकारी

नागरिकांना बेकायदेशीर सावकारांपासून त्रास होत असल्यास त्यांनी त्यांच्या त्रासाला सामोरे न जाता सहाय्यक निबंधक शिरुर तसेच जवळील पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करावी, तक्रार आल्यास कोणीही सावकार असला तर त्याची गय केली जाणार नाही शिरुर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांनी सांगितले.

नागरिकांनी बिनधास्त तक्रार करावी: शंकर कुंभार सहाय्यक निबंधक

खाजगी सावकारांबाबत नागरिकांनी आमच्या सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे तक्रार केल्यास आम्ही चौकशी करुन बेकायदेशीरपणे काम करणाऱ्या लोकांवर तातडीने गुन्हे दाखल करु, त्यामुळे नागरिकांनी व्यथित न होता, न घाबरता आमच्या कार्यालयाकडे तक्रारी कराव्यात असे आवाहन शिरुरचे सहाय्यक निबंधक शंकर कुंभार यांनी केले आहे.