आरोग्य विषयक उपयुक्त माहिती…

आरोग्य

आले ही कंदयुक्त व एक मीटरपर्यंत वाढणारी क्षुपवर्गीय वनस्पती आहे. याच्यावर प्रक्रिया करून वाळवून सुंठ तयार करतात. भारतात कर्नाटक, बंगाल, ओरिसा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश इ. ठिकाणी आल्याची लागवड करतात.

औषधी उपयोग

उलटी, मळमळ होत असल्यास आले व कांद्याचा रस समभाग घेऊन एक एक चमचाभर घ्यावा.

अतिशय सर्दी व नाक बंद झाले तर सुंठ व वेखंड यांचे सूक्ष्म चूर्ण करून नाकाने ओढावे. म्हणजे कफ निघून नाक मोकळे होते.

पक्षवात, वातविकारात गाईचे तूप 100 ग्रॅम त्यामध्ये सुंठीचे चूर्ण 100 ग्रॅम परतून घ्यावे. सोललेला लसूण 100 ग्रॅम त्यात टाकून एकत्र करावे. त्यातून दहा ग्रॅम रोज खावे. हे नियमित खाल्लाने वातविकार कमी होतो.

पोटात जंत झाल्यास सुंठ व वावडिंगाचे चूर्ण मधातून घ्यावे.

अजीर्णावर सुंठ व जवखार यांचे चूर्ण तूपातून घ्यावे.

अतिसारावर आल्याचा रस नाभीला चोळावा.

आमवातावर सुंठीचा काढा करून त्यात एरंड तेल टाकून द्यावे.

खोकल्यावर आल्याचा रस मधातून द्यावा.

जीर्णज्वरात सुंठ ताकाच्या निवळीत उगाळून 21 दिवस घ्यावी.