ठाणे: ठाणे महानगरातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी महापालिका भवन ते लुईसवाडी आणि पुन्हा महापालिका भवन असा प्रवास या बसमधून करत सुविधेची पाहणी केली.
या प्रसंगी महापौर शर्मिला पिंपळोलकर, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपमहापौर कृष्णा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
जी.सी.सी. तत्वावर या बसेस ठाणे परिवहन सेवेत दाखल होत असून याचा आर्थिक भार परिवहनवर पडणार नसल्याचे सांगण्यात आले. या डबल डेकर बसमध्ये एकावेळी 65 प्रवासी बसू शकतात, तर 33 प्रवासी उभे राहून प्रवास करू शकतात.
सध्या ही बस तीन हात नाका ते गायमुख या मार्गावर धावणार असून, इलेक्ट्रिक बस असल्यामुळे प्रवास पर्यावरणपूरक होणार आहे. तसेच, परिवहन ताफ्यात आणखी 9 इलेक्ट्रिक बसेस लवकरच दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आली.