मुंबई: बेस्ट पतपेढी निवडणुकीत दारुण पराभव होताच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज (गुरूवार) सकाळी वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण आले आहे.
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाला. त्यांना एकही जागा जिंकता आली नव्हती. या निकालानंतर भाजपच्या नेत्यांनी ब्रँड ठाकरेची खिल्ली उडवत टीकेची झोड उठवली होती. मात्र, भाजपचे नेते फक्त उद्धव ठाकरे यांनाच लक्ष्य करताना दिसत होते. राज ठाकरे यांच्याबाबत त्यांच्या बोलण्यात सहानुभूती आणि सॉफ्ट कॉर्नर दिसून आला होता. एकाही भाजप नेत्याने राज ठाकरे यांच्यावर टीका करण्याची हिंमत केली नव्हती. त्यामुळे भाजपला राज ठाकरे अजूनही आपल्याकडे परततील, अशी आशा असल्याची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या बैठकीनंतर काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
दरम्यान, यापूर्वी शिवसेना आणि मनसे युतीची चर्चा सुरु असताना 12 जून रोजी वांद्र येथील ताज लँडस् हॉटेलमध्ये देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची गुप्त भेट झाली होती. या भेटीत उभय नेत्यांमध्ये दीर्घ चर्चा झाली होती. मात्र, त्यानंतर राज ठाकरे हे वरळीतील मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर एकत्र दिसून आले होते. त्यानंतर शिवसेना आणि मनसे युतीच्या वाटाघाटींना वेग आला होता. मात्र, आता बेस्ट पतपेढी निवडणुकीतील दारुण पराभव आणि देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीने शिवसेना-मनसेच्या युतीच्या प्रक्रियेला पुन्हा ब्रेक लागणार का, हे बघावे लागेल.
विरोधी पक्षाचे नेते भेटायला गेले. त्यांच्यात काही चर्चा सुरू असेल तर होऊ द्या, असं शिवसेना ठाकरे गटाते खासदार संजय राऊत म्हणाले. राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस अनेकदा भेटले आहेत. कदाचित ते गणपतीचं आमंत्रण द्यायला गेले असतील. राज्यातील विविध प्रश्नावर चर्चा सुरू असेल, असे संजय राऊत म्हणाले.