लग्नाचे आमिष दाखवून विद्यार्थिनीवर वारंवार लैंगिक अत्याचार; नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा

क्राईम महाराष्ट्र

रत्नागिरी: शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून २०२१ ते २०२६ या कालावधीत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित महाविद्यालयातील एका प्राध्यापकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात, विशेषतः शिक्षण क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

दिलीप ज्ञानेश्वर जाधव (वय ४५, मूळ रा. सावर्डे, ता. चिपळूण, सध्या रा. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित प्राध्यापकाचे नाव आहे. पीडिता इयत्ता दहावीत शिक्षण घेत असतानाच तिची संशयित प्राध्यापकासोबत ओळख झाली होती. त्यावेळी पीडिता अल्पवयीन होती. पुढे अकरावीच्या शिक्षणासाठी ती संबंधित महाविद्यालयात दाखल झाल्यानंतर संशयिताने तिच्याशी हळूहळू जवळीक वाढवली.

लग्नाचे आश्वासन देत विश्वास संपादन करून संशयित प्राध्यापकाने २०२१ पासून २०२६ पर्यंत विविध ठिकाणी तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे. या काळात संशयिताने भावनिक दबाव टाकत तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि त्याच आधारे तिचे लैंगिक शोषण केल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे.

दरम्यान, दीर्घकाळानंतर संशयित प्राध्यापकाने लग्नास स्पष्ट नकार दिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे पीडितेच्या लक्षात आले. मानसिक धक्का बसलेल्या पीडितेने घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला. नातेवाईकांनी तातडीने शहर पोलिस ठाण्यात धाव घेत अधिकृत तक्रार दाखल केली.

या तक्रारीच्या आधारे शहर पोलिसांनी संशयित प्राध्यापकाविरोधात भारतीय दंड विधान कलम ६४(१), ६४(२)(फ), ६९, ३५१ तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पीडिता अल्पवयीन असताना अत्याचार झाल्याने पोक्सो कायद्यांतर्गत गंभीर कलमे लावण्यात आली आहेत.

या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक प्रियंका देसाई करत असून, संशयित प्राध्यापकाच्या भूमिकेची सखोल चौकशी सुरू आहे. तसेच पीडितेचा जबाब, वैद्यकीय तपासणी आणि इतर पुरावे संकलित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.

शिक्षण क्षेत्रात संताप, कठोर कारवाईची मागणी

शिक्षकासारख्या जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीकडूनच विद्यार्थिनीवर दीर्घकाळ अत्याचार झाल्याची ही घटना अत्यंत गंभीर, धक्कादायक आणि चिंताजनक असल्याची भावना नागरिक, पालक व शिक्षणप्रेमींमधून व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

शहरातील दुसरी गंभीर घटना

विशेष म्हणजे, शहरात शिक्षण क्षेत्राशी संबंधित अशा स्वरूपाची ही दुसरी गंभीर घटना आहे. यापूर्वी जानेवारी २०२५ मध्ये शहरातील एका नामांकित शाळेत प्रॅक्टिकल शिकवण्याच्या बहाण्याने दहावीच्या विद्यार्थिनीशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्या प्रकरणानंतरही अशा घटना घडत राहणे हे संपूर्ण शिक्षकी पेशाला काळिमा फासणारे असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.