सहावीच्या मुलीवर ॲसिड हल्ला; कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह

क्राईम महाराष्ट्र

मुंबई: विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील महिला व बालिकांवरील वाढत्या अत्याचारांवर तीव्र नाराजी व्यक्त करत संगमनेरमधील सहावीतील विद्यार्थिनीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. या धक्कादायक घटनेमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्थगन प्रस्तावाद्वारे बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, इतकी भीषण घटना घडूनही आरोपी अजूनही मोकाट कसा आहे? पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक उरला आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. जखमी मुलगी गंभीर अवस्थेत असून, आरोपींना तात्काळ अटक करण्यात पोलिस अपयशी ठरत असल्याची टीकाही त्यांनी केली.यावेळी त्यांनी स्थानिक पोलीस प्रशासनावरही गंभीर आरोप केले. संबंधित पोलीस अधीक्षक गुन्हेगारांना पकडण्याऐवजी भ्रष्टाचारात गुंतले असल्याचा आरोप करत, अशा निष्क्रियतेमुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढत असल्याचे ते म्हणाले. “जेव्हा रक्षकच भ्रष्ट होतात, तेव्हा अशा क्रूर घटना घडतात,” असेही त्यांनी नमूद केले.

राज्यातील गृहखात्याचा पोलिसांवर वचक उरलेला नाही, तसेच लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याची टीका त्यांनी केली.या गंभीर प्रकरणाची दखल घेत विधानसभा अध्यक्षांनी शासनाला तातडीने सविस्तर निवेदन सादर करण्याचे निर्देश दिले असून, या घटनेवर लवकरच सभागृहात चर्चा होण्याची शक्यता आहे.