पोलिसांना नाश्ता पुरवल्याने महिलेला नोकरीहून काढले अन…

क्राईम

संस्था चालकांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची महिलेची मागणी

शिक्रापूर (शेरखान शेख): कोंढापुरी (ता. शिरुर) येथील श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या आर. एम. धारिवाल सिंहगड मॅनेजमेंट स्कूल मधील महिलेने आजारी असल्याने सुट्टी घेतल्यानंतर एक जानेवारी २०२३ रोजी कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमसाठी आलेल्या पोलिसांसाठी लावलेल्या चहा, नाश्ताच्या पुरवण्याच्या स्टॉल मधील पोलिसांना नाश्ता पुरवल्याने संस्थेच्या संचालकांनी महिलेला त्याबाबत नोटीस देऊन चक्क नोकरीवरुन काढल्याची धक्कादायक घटना घडली असल्याने संस्था चालकांवर ॲट्रॉसिटी नुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी छाया गायकवाड या महिलेने केली आहे.

कोंढापुरी (ता. शिरुर) येथील श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या आर. एम. धारिवाल सिंहगड मॅनेजमेंट स्कूलमध्ये छाया एकनाथ गायकवाड या नोकरीला असून त्या आजारी असल्याने त्यांनी २७ डिसेंबर २०२२ पासून सुट्टी घेत असल्याचे व्यवस्थापकांना सांगून सुट्टी घेतली. त्यानंतर एक जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमामध्ये आलेल्या नागरिक व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी छाया गायकवाड यांचा मुलगा आनंद गायकवाड याने चहा नाश्ता पुरवण्याचा स्टॉल लावल्याने गायकवाड या समाज बांधवांच्या सेवेसाठी सदर ठिकाणी हजर राहिल्या होत्या त्याबाबतची माहिती संस्था चालकांना मिळाली.

त्यानंतर संस्था चालक डॉ. अनिता माने यांनी खोटे कारण सांगून सुट्टी घेतल्याबाबतचे नोटीस छाया गायकवाड यांना दिले त्यांनतर गायकवाड यांना उद्धटपणे बोलून पोलिसांनाचा खायला घाल यांसह आदी प्रकारे सुनावत अपमानित करुन बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पुन्हा संस्था संस्थापक मारोती नवले यांनी नोटीस देऊन नोकरीवरुन काढण्यात आले. त्यामुळे छाया एकनाथ गायकवाड यांनी पोलीस अधिक्षकांसह शिक्रापूर पोलीस व मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पत्र देऊन संस्था चालक डॉ. अनिता माने व संस्थापक मारोती नवले यांच्यावर ॲट्रॉसिटी नुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तर याबाबत प्रतिक्रिया विचारण्यासाठी संस्था चालक डॉ. अनिता माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले असून पोलीस अधिकारी यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोंढापुरी येथील घटनेबाबत छाया गायकवाड यांनी शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार अर्ज दिलेला असून पोलीस त्याबाबत चौकशी करतील तसेच वरिष्ठ कार्यालयाकडून आपणाकडे अर्ज आल्यास आपण देखील त्याबाबतची चौकशी करुन पुढील कार्यवाही करु, असे शिरुर उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांनी सांगितले.