मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून बाळासाहेब थोरात भडकले

महाराष्ट्र राजकीय

प्रश्नोत्तराच्या तासाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहणे हा संकेत

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज हे सर्वोच्च आहे, या ठिकाणी जनतेचे प्रश्न सोडवले जातात, त्यामुळे निदान प्रश्नोत्तराच्या तासाला तरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी उपस्थित राहायला पाहिजे. हा संकेत आता पाळला जात नाही, अध्यक्षांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला सक्त शब्दात टाकीत दिली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात केली.

दिवसाचे विधिमंडळाचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात मंत्र्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, हे सर्वोच्च सभागृह आहे. महाराष्ट्राचे प्रश्न इथे मांडले जातात, ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातात. या माध्यमातून शासन आणि यंत्रणा गतिमान होते. या अगोदर कायम प्रश्नोत्तराच्या तासाला बाकीची कामे बाजूला ठेवून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्वच मंत्री जातीने हजर राहायचे. आता जर मुख्यमंत्री प्रश्नोत्तराच्या तासाला सभागृहात येणार नसतील तर मग आमदार त्यांची काम घेऊन त्यांच्या दालनात जातात आणि सभागृहात त्यामुळे उपस्थिती कमी होते. ज्या सदस्यांना प्रश्न मांडण्याची संधी मिळाली आहे त्यांचे प्रश्न सुटत नाही.

लक्षवेधी दरम्यानही बाळासाहेब थोरात यांनी मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून प्रश्न उपस्थित केला, ज्या त्या खात्याचे मंत्री जर उपस्थित नसतील तर मग लक्षवेधीला अर्थ काय उरतो. मंत्री जर असे सांगत असतील की सकाळी 6 वाजता मला उठावे लागते, तर सकाळी उठण्यात की उशिरापर्यंत काम करण्यास वावगे काय? आपण मंत्री झालो आहोत, त्यामुळे या गोष्टी कराव्यात लागतात. मंत्रीपदाच्या मोठेपणात या सर्व गोष्टी दडलेल्या आहेत. त्यामुळे कामकाज मंत्री महोदयांनी गांभीर्याने घेतले पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि सदस्यांचे समाधान केले पाहिजे.