मुंबई: दादासाहेब फाळके चित्रनगरी अर्थात महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामध्ये शाश्वत व हरित चित्रनगरी सप्ताह सुरू आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून चित्रनगरीतील स्वच्छतादुतांचा गुलाबाचं फूल आणि कॅलेंडर देऊन विशेष सन्मान करण्यात आला आहे.
३ ते ८ फेब्रुवारीदरम्यान चित्रनगरीत ‘माझी चित्रनगरी, हरित चित्रनगरी’ ही मोहिम राबवली जात आहे. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिका, इंडियन पोलुशन कंट्रोल असोसिएशन व बी द चेंज संस्था यांच्या सहकार्याने महामंडळ उपक्रम राबवत आहे.
सेटवरच्या स्वच्छतादुतांचा सन्मान
स्वच्छ आणि हरित चित्रनगरी ठेवण्यासाठी सर्वच निर्मितीसंस्थांना आवाहन करण्यात आले असून या सेटची निगा राखणाऱ्या , कचऱ्याचे व्यवस्थापन करणाऱ्या सेटवरील स्वच्छतादुतांची कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा सन्मान करण्यात आला. या अनोख्या सन्मानामुळे निर्मितीसंस्थांनीदेखील महामंडळाचे आभार व्यक्त करत परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.