मुंबई: मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF) २०२६ निमित्त दादासाहेब फाळके चित्रनगरीत आयोजित करण्यात आलेल्या मराठी लघुपट आणि माहितीपटांच्या विशेष महोत्सवाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत आयोजित या महोत्सवात निवडक १९ मराठी लघुपट आणि माहितीपटांचे प्रदर्शन सुरू आहे.
गुरुवारी प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मकमळ’, ‘गढूळ’, ‘डिअर २०२’, ‘१७ वे वर्ष’ या लघुपटांसह ‘फड’ या माहितीपटाला रसिकांनी मोठी पसंती दिली. प्रदर्शनावेळी उपस्थित लेखक आणि दिग्दर्शकांचा महामंडळाच्या वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा वित्त अधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ‘मायबाचे आशीर्वाद’, ‘मेतकूट’, ‘नेहमीच’ या लघुपटांसह ‘फड’ या माहितीपटाचे प्रदर्शन करण्यात आले होते. चित्रपट रसिक, विद्यार्थी, अभ्यासक आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रातील मान्यवरांकडून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून आशयघन कथा, संवेदनशील विषयांची मांडणी आणि उत्कृष्ट चित्रभाषेमुळे चित्रपटांचे विशेष कौतुक होत आहे.
महोत्सवात पुढील काही दिवसांमध्येही विविध दर्जेदार लघुपटांचे प्रदर्शन होणार असून मराठी चित्रपटसृष्टीतील नव्या प्रतिभांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.