संभाजीनगर: राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि सकारात्मक पाऊल उचललं असून शेतकऱ्यांना आता कमीत कमी एक हजार रुपये पीक विमा मिळणार असून, विमा कंपनीची रक्कम कमी असल्यास उर्वरित रक्कम राज्य सरकार देणार असल्याची मोठी घोषणा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.
कमीत कमी एक हजार रुपये पीकविमा मिळणारच
खरीप हंगाम 2022 मधील काही पिक विमाधारक शेतकऱ्यांना विमा मिळाला नसल्याबाबतचा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता. यावर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर देत सांगितले की, 2022 च्या खरीप हंगामात एकूण विमाधारक शेतकऱ्यांना 3180 कोटी इतकी पिक विमा रक्कम मंजूर करण्यात आली असून त्यापैकी सुमारे 3148 कोटी इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे. तसेच उर्वरित शेतकऱ्यांची विम्याची रक्कम ही 1000 रुपये पेक्षा कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना कमीत कमी एक हजार रुपये पिक विमा मिळावा, अशी शासनाची भूमिका आहे. त्यावर उपाय म्हणून यापुढे शेतकऱ्यांना विम्या पोटी मिळणारी रक्कम 1000 रुपयांपेक्षा कमी असल्यास त्यात उर्वरित रक्कम राज्य शासन देईल आणि शेतकऱ्यांना कमीत कमी 1 हजार रुपये पिक विमा हा निश्चित मिळेल, अशी घोषणाही धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत केली आहे.
राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून तुषार आणि ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना कमीत कमी 20 गुंठे जमिनीची अट आहे. ही अट शिथिल करण्याबाबत माजी राज्य मंत्री आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना धनंजय मुंडे यांनी सदर अट वीस गुंठे वरून दहा गुंठेपर्यंत शिथिल करण्यात यावी, याबाबत देखील केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती सभागृहास दिली.