शिरुर तालुक्यात सरकारी कार्यालयात तब्बल ६७ वर्षांपासून सुरु आहे वीजचोरी

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील आंधळगाव ग्रामपंचायतीमध्ये तब्बल ६७ वर्षापासून विजचोरी होत आहे. ही ग्रामपंचायत सन १९५६ साली निर्माण झाली होती. परंतु आंधळगाव ग्रामपंचायत कार्यालयाने आजपर्यंत कोणतेही अधिकृत वीज कनेक्शन घेतले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ग्रामपंचायतीमध्ये अनधिकृत वीज पुरवठा सुरु आहे.

राज्यातील शहरी अन् ग्रामीण भागात वीज पुरवठा आणि वीज बिल वसुली करण्याचे काम महावितरणकडून करण्यात येते. परंतु महावितरण कंपनीत वीज गळती अन् वीज चोरीचे प्रमाण मोठे आहे. आता हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

महावितरण कंपनीकडून वीजचोरी रोखण्यासाठी अनेक प्रयत्न सुरु असतात. वीज चोरीला आळा बसावा, यासाठी महावितरणचे भरारी पथक असते. या पथकाकडून वीजचोरी विरुद्ध नियमित मोठ्या मोहिमा राबविण्यात येतात. तसेच ‘वीजचोरी कळवा अन् बक्षीस मिळवा’ ही योजनाही राबवली जाते. त्यानंतर महावितरणची वीज चोरी कमी झालेली नाही. अनेक ठिकाणी वीज चोरी अन् वीज गळती सुरु असते. परंतु आता वीज चोरीचा हा धक्कादायक प्रकार समोर आला.

सरकारी कार्यालयाकडून तब्बल ६७ वर्षांपासून वीज चोरी केली जात होती. १९५६ पासून वीज चोरी होत असताना महावितरणला माहितीच नाही. विशेष म्हणजे ही चोरी एका सरकारी कार्यालयाकडून केली जात होती. म्हणजेच चक्क ग्रामपंचायत कार्यालय अनेक वर्षांपासून वीज चोरी करत होते. माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे.

महावितरणकडून विजचोरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. परंतु आता सरकारी कार्यालय असलेल्या ग्रामपंचायतीने हा प्रकार केला आहे. यामुळे महावितरण कोणाविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करणार? याकडे आता शिरूर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे, आता हा प्रश्न आहे.