तुमच्या गावात कृषी सेवा केंद्र कसं सुरू कराल, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

महाराष्ट्र

कृषी सेवा केंद्र सुरू करणं म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आधार बनण्यासारखं आहे. या केंद्रातून तुम्ही त्यांना बियाणे, खते, कीटकनाशके, औषधे आणि इतर शेती साहित्य उपलब्ध करून देता. हा व्यवसाय तुम्हाला चांगला नफा मिळवून देईल आणि शेतकऱ्यांच्या गरजाही पूर्ण करेल. चला, कृषी सेवा केंद्र सुरू करण्याची संपूर्ण प्रक्रिया समजून घेऊया.

1) शैक्षणिक पात्रता

तुम्ही किमान १२ वी (सायन्स) पास असणं गरजेचं आहे.

जर तुमच्याकडे कृषी डिप्लोमा किंवा B.Sc Agriculture ची पदवी असेल, तर तुम्हाला अधिक चांगली संधी मिळते आणि परवाना मिळवणं सोपं होतं.

2) आवश्यक कागदपत्रे

अर्ज करताना खालील कागदपत्रं तयार ठेवा

आधार कार्ड

पॅन कार्ड

7/१२ उतारा (शेतजमीन तुमच्या नावावर असल्यास)

निवासी प्रमाणपत्र

1२ वी आणि कृषी शिक्षणाचे प्रमाणपत्र

दुकान भाडे करारनामा किंवा दुकानाच्या मालकीची कागदपत्रे

पासपोर्ट साईज फोटो

फर्म नोंदणी प्रमाणपत्र (जर तुम्ही फर्म म्हणून नोंदणी केली असेल तर)

3) दुकानासाठी जागा 

तुमच्या दुकानासाठी किमान १०x१० फूट जागा आवश्यक आहे.

गावात किंवा तालुक्याच्या ठिकाणी, जिथे शेतकऱ्यांची ये-जा जास्त असते, अशी जागा निवडणं फायदेशीर ठरतं.

४) आवश्यक परवाने

कृषी सेवा केंद्र परवाना (KSK License): यासाठी तुम्हाला जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागतो. काही राज्यांमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची सोय आहे.

कीटकनाशक परवाना: कृषी शिक्षण असलेल्यांसाठी हा परवाना आवश्यक असतो. यासाठी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करा.

खते विक्री परवाना: हा परवाना राज्य कृषी विभागामार्फत दिला जातो. BIS मान्यताप्राप्त खत कंपन्यांची उत्पादने विकण्यासाठी हा परवाना लागतो.

बियाणे विक्री परवाना: हा बीज निरीक्षक कार्यालयातून मिळतो आणि अधिकृत बियाण्यांचे वितरण करण्यासाठी आवश्यक आहे.

५) GST नोंदणी 

जर तुमच्या व्यवसायाचं वार्षिक उत्पन्न २० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर GST नोंदणी करणं बंधनकारक आहे.

अर्ज प्रक्रिया: स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शन

१) कृषी अधिकारी कार्यालयात भेट द्या 

तुमच्या जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या कृषी कार्यालयात जाऊन तिथे उपलब्ध असलेला अर्ज फॉर्म घ्या.

2) अर्ज फॉर्म भरा 

अर्जात तुमचं नाव, पत्ता, शैक्षणिक पात्रता, दुकानाची माहिती आणि तुम्हाला कोणते परवाने हवे आहेत (खते, बियाणे, कीटकनाशके) ही माहिती भरा.

3) आवश्यक कागदपत्रे जोडा 

वर नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडा. यात शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्रे, पत्त्याचा पुरावा आणि दुकानाची कागदपत्रे यांचा समावेश आहे. काही ठिकाणी शपथपत्र (Affidavit) देखील गरजेचं असतं.

4) अर्ज सादर करा

भरलेला अर्ज आणि सर्व कागदपत्रे कृषी कार्यालयात जमा करा. अर्ज स्वीकारल्यावर तुम्हाला एक अर्ज क्रमांक (Application Number) मिळेल, तो जपून ठेवा.

5) दुकान पाहणी आणि छाननी

अर्ज जमा केल्यानंतर, कृषी निरीक्षक तुमच्या दुकानाची प्रत्यक्ष पाहणी करतील. ते जागेची योग्य प्रकारे पाहणी करतील आणि सुरक्षेच्या तसेच उपलब्ध सुविधांच्या बाबतीत खात्री करतील.

6) परवाना मंजुरी आणि प्राप्ती

सर्व तपासणी पूर्ण झाल्यावर आणि माहिती योग्य आढळल्यास, तुम्हाला अधिकृत परवाना दिला जाईल. या प्रक्रियेला साधारणपणे १५ ते ३० दिवस लागू शकतात.

7) व्यवसाय सुरू करा

परवाना मिळाल्यावर तुम्ही अधिकृतपणे तुमचं कृषी सेवा केंद्र सुरू करू शकता. आता तुम्ही खत, बियाणे आणि कीटकनाशके कंपन्यांशी संपर्क साधून माल मागवू शकता.

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

काही राज्यांमध्ये कृषी सेवा केंद्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. महाराष्ट्रासाठी तुम्ही https://mahaagri.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

ऑनलाईन अर्ज कसा कराल

1. संकेतस्थळावर लॉग इन करा.

2. ‘Input Dealer License’ किंवा ‘कृषी सेवा केंद्र नोंदणी’हा पर्याय निवडा.

3. आवश्यक फॉर्म भरा आणि सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.

परवाना शुल्क 

कृषी सेवा केंद्राच्या परवान्यासाठी साधारणपणे ५०० ते २००० रुपये शुल्क लागू शकते. अचूक रक्कम स्थानिक कृषी कार्यालय निश्चित करते.