अनाधिकृत बांधकामे हटवण्यासाठी १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदत
संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने जालना रोड, पैठण रोड, बीड बायपास रोड, आणि पडेगाव-मिटमिटा सर्व्हिस रोडवरील बाधित रहिवासी मालमत्ताधारकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, या रहिवाशांना त्यांच्या मालमत्तेवरील अनाधिकृत बांधकामे स्वतःहून काढून टाकण्यासाठी १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, ही मुदत केवळ रहिवासी मालमत्ताधारकांसाठी असून, यामध्ये व्यावसायिक मालमत्ता किंवा अन्य कोणत्याही मालमत्तांचा समावेश नाही.
गुंठेवारी नियमितीकरणाची विशेष संधी
याव्यतिरिक्त, ज्या मालमत्ताधारकांची ३१ डिसेंबर २०२० पूर्वीची अनाधिकृत बांधकामे आहेत आणि ज्यांना कायदेशीर कारवाईचा धोका आहे, अशा मालमत्ताधारकांसाठी गुंठेवारी नियमितीकरणाची विशेष संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मनपाने नागरिकांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी वेळेत कार्यवाही करून कायदेशीर अडचणी टाळाव्यात, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.