लोखंडवाला गोळीबार प्रकरण! अभिनेता केआरके अटकेत, पोलिसांकडून चौकशी सुरू

क्राईम महाराष्ट्र

मुंबई: अंधेरीतील वर्सोवा–लोखंडवाला परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, या प्रकरणात बॉलिवूड अभिनेता आणि वादग्रस्त रिव्ह्यूअर कमाल आर खान (KRK) याला पोलिसांनी अटक केली आहे. काल मध्यरात्री अंधेरी परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीनंतर त्याचा या घटनेतील सहभाग निष्पन्न झाल्याचा पोलिसांचा दावा आहे.या घटनेमुळे लोखंडवाला परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, फिल्म इंडस्ट्रीतही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

पिस्तूल साफ करताना गोळी सुटल्याचा दावा

तपासादरम्यान केआरकेने पोलिसांसमोर विचित्र दावा केला आहे. परवाना असलेले पिस्तूल साफ करत असताना चुकून गोळी सुटल्याचे त्याने सांगितले. ही गोळी घराशेजारील खारफुटीच्या दिशेने गेल्याचा दावा केआरकेने केला आहे. मात्र, पोलिसांच्या तांत्रिक तपासात हा दावा संशयास्पद वाटत असून, गोळीबारामागील नेमका उद्देश काय होता, याचा शोध सुरू आहे.

नालंदा इमारतीत गोळी शिरली

या घटनेतील गोळी थेट लोखंडवाला येथील नालंदा या हाय-प्रोफाइल निवासी इमारतीत शिरली. इमारतीच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर गोळी लागल्याचे समोर आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र एका व्यक्तीचा जीव थोडक्यात वाचल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मॉडेल प्रतीक बेदी थोडक्यात बचावला

गोळी चौथ्या मजल्यावर शिरली, त्यावेळी मॉडेल प्रतीक बेदी आपल्या घरात रिहर्सल करत होता. गोळी त्याच्या अगदी जवळून गेल्याने तो थोडक्यात बचावला. या घटनेनंतर घाबरलेल्या प्रतीक बेदीने तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी वेगाने हालचाली करत केआरकेला ताब्यात घेतले.

वाऱ्यामुळे दिशा बदलल्याचा दावा

केआरकेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पिस्तूल कार्यरत आहे का हे तपासण्यासाठी त्याने गोळी झाडली होती. खारफुटीचा मोकळा परिसर असल्याने कोणालाही धोका होणार नाही, असा त्याचा अंदाज होता. मात्र, वाऱ्यामुळे गोळीची दिशा बदलून ती ओशिवरा येथील निवासी इमारतीवर लागल्याचा दावा त्याने केला आहे. कोणालाही इजा करण्याचा हेतू नव्हता, असेही त्याने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पोलिसांकडून शस्त्र परवाना, घटनास्थळाचा अहवाल आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू असून, केआरकेविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया चालू आहे.