उमेद, धाडस वाढविण्यासाठी चांगली पुस्तके वाचा, सोशल मीडिया कायद्याच्या चौकटीत असायला हवे
मुंबई: मराठी साहित्य भाषा अजरामर करणारे वरदान आहे.मुलामुलींची उमेद,धाडस वाढविण्यासाठी चांगली पुस्तके वाचायला द्या,वाचन संस्कृती वाढवा” असे आवाहन विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी केले .
उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय मुंबई शहर आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय,दादर यांच्या वतीने ‘मुंबई ग्रंथोत्सव २०२४” चे आयोजन करण्यात आले आहे.५ आणि ६ फेब्रुवारी असे दोन दिवस सुरू राहणाऱ्या या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन मराठी भाषा मंत्री उदय सामंत,विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांच्या हस्ते करण्यात आले.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय,दादर यांनी ग्रंथालयीन अभ्यासिका सुरू केली,जतन केली याबद्दल आभार व कौतुक करते.महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नवीन लेखक लिखाण करत आहेत ;अनेक अनुभव लिहिले जात आहेत, याचा समाजाला नक्की फायदा होणार आहे.राज्य सरकार बालक व महिला साहित्य संमेलन घेणार आहेत यामुळे वाचन संस्कृती जोपासण्यास मदत होईल असेही डॉ.नीलम गो-हे म्हणाल्या.
कुटुंबामध्ये लोकशाही नाही असे मी मानते, लोकशाही असती तर ऑनर किलींगसारख्या घटना घडल्या नसत्या.समाजात वर्ण,रंग,लिंगभेद दुजाभाव वाढत चालल्याची खंत नीलम गो-हे यांनी यावेळी व्यक्त केली.सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे काही वेबसाईटमुळे बुद्धीगहाण टाकण्यापर्यंत,आत्महत्त्येपर्यंत लोकांची मानसिकता तयार होत आहे.अश्यात सोशल मीडिया कायद्याच्या चौकटीत असायला हवा “असेही उपसभापती डॉ. नीलम गो-हे म्हणाल्या.
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, दादर प्रामाणिकपणे ग्रंथालय,वाचनालय चालवत आहेत. पुण्यातील विश्व मराठी संमेलनात पुस्तक आदानप्रदान झाल्याने ३५ हजार पुस्तके ग्रंथालयात आली . तीच पुन्हा घरोघरी गेली हा चांगला उपक्रम आहे.पुस्तक वाचन संस्कृती वाढविण्यासाठी महाराष्ट्र सरकार बाल साहित्य संमेलन,युवा साहित्य संमेलन आणि महिला साहित्य संमेलन सुरू करणार असल्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तसेच मराठी भाषेविरोधातील दादागिरी मोडीत काढण्यासाठी सरकारने तयारी केल्याचेही मंत्री उदय सामंत म्हणाले.