एकनाथ शिंदेंना भेटलो, उद्या मुख्यमंत्र्यांनाही भेटेन! प्रत्येक भेटीत राजकारण शोधू नका; राज ठाकरे

महाराष्ट्र

ठाणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील ‘नंदनवन’ या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. संभाव्य आघाडी किंवा नव्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगू लागली असताना राज ठाकरेंनी स्वतः पुढे येत या भेटीमागील कारण स्पष्ट केले.

“निवडणुका आत्ता नाहीत; सूचना देण्यासाठी भेटलो”

राज ठाकरे म्हणाले, “आपल्याकडे पूर्वीसारखं निकोप राजकारण राहिलेलं नाही. कुणी कुणाला भेटलं की लगेच युती-आघाडीचा अर्थ लावला जातो. निवडणुका तीन वर्षांनी आहेत. त्या नुकत्याच पार पडल्या आहेत. आज ते सत्तेत आहेत. आम्हाला काही सूचना द्यायच्या असतील, चांगल्या गोष्टी करून घ्यायच्या असतील तर भेटायला नको का? प्रत्येक भेटीत राजकारण शोधण्याची गरज नाही. उद्या मी मुख्यमंत्र्यांनाही भेटेन.”

शहरांच्या बिकट प्रश्नांवर चर्चा

मुंबई, ठाणे आणि पुणे या शहरांमधील वाढत्या समस्यांबाबत आपण चर्चा केल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.“रस्ते आणि फ्लायओव्हर बांधणं म्हणजे विकास नव्हे, ती फक्त सूज आहे. शहरांमध्ये विकासकामे सुरू असली तरी नियोजनाचा अभाव आहे. वाहनांची संख्या वाढली आहे, पण रस्त्यांची क्षमता मर्यादित आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी गंभीर बनत आहे,” असे ते म्हणाले.या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही यापूर्वी सूचना केल्याचे सांगितले. तसेच एकनाथ शिंदेंनी संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधल्याची माहितीही त्यांनी दिली.

मनसैनिकांना निवडणूक तयारीचे आदेश

दरम्यान, पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे आदेश दिले.“सत्तेत असलेल्यांचीही एक्सपायरी डेट असते. महाराष्ट्र सध्या आयसीयूमध्ये आहे. राजकीय सूज कायमस्वरूपी नाही. अनेक आंदोलनं केली, पण आता निवडणूक हाच कार्यक्रम आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.या भेटीमुळे सध्या तरी कोणत्याही नव्या राजकीय आघाडीचे संकेत मिळाले नसले, तरी आगामी काळात राज्यातील राजकारणात नवे वळण येण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.