ओस्तवाल पॅराडाईज घोटाळा उघडकीस; रहिवाशांची 2 कोटींच्या फसवणुकीची गंभीर तक्रार

महाराष्ट्र

मिरा रोड: मिरा रोड पूर्व येथील ओस्तवाल पॅराडाईज सोसायटीमधील रहिवाशांनी विकासकांविरोधात सुमारे 2 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करत नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत फसवणूक, बनावट दस्तऐवज तयार करणे, व कायद्याच्या मंजुरीशिवाय बांधकाम वाढवणे अशा गंभीर मुद्द्यांचा समावेश आहे.

सोसायटीचे सचिव पुढे सरसावले

तक्रारदार श्री. रंजीत उमेश्वर झा (वय 46), ओस्तवाल पॅराडाईज, इमारत क्र. 6 चे रहिवासी व सध्या सोसायटीचे सचिव असून, त्यांनी विकासक मेसर्स श्री. ओस्तवाल बिल्डर्स लि. यांच्या विरोधात तपशीलवार निवेदन सादर केले.

बनावट नकाशे व बेकायदेशीर मजले

तक्रारीनुसार, विकासकाने मूळ मंजुरीनुसार केवळ 4 मजले बांधण्याची परवानगी असताना 7 मजली इमारत उभारली. यासाठी बनावट सुधारित नकाशे सादर करण्यात आले व मंजूर FSI चा अतिरेक वापर करण्यात आला. विशेष म्हणजे इतर इमारतींच्या FSI चा वापर करून नवीन इमारत क्र. 9 उभारण्यात आली, जे नियमबाह्य आहे.

विश्वासघात व बनावट दस्तऐवजांचा वापर

2015 पासून कन्व्हेन्स प्रक्रिया सुरू होती. 2019 मध्ये MOU द्वारे विकासकाने काही अटी मान्य केल्या; परंतु त्या पूर्ण केल्या गेल्या नाहीत. परिणामी 2021 मध्ये सोसायटीने ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मागे घेतले. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मिळवलेल्या दस्तऐवजांवरून बनावट परवानग्या व दस्तऐवजांची साखळी उघडकीस आली आहे.

कायदेशीर कारवाईची मागणी

तक्रारदार व सोसायटी सदस्यांनी पोलिसांकडे IPC कलम 420 (फसवणूक), 468 (खोटे दस्तऐवज तयार करणे), 471 (बनावट दस्तऐवजाचा वापर), व MOFA अधिनियमाचे उल्लंघन याखाली गुन्हा दाखल करून चौकशीची मागणी केली आहे.

निवासीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण

या प्रकारामुळे इमारतींच्या रहिवाशांमध्ये प्रचंड चिंता निर्माण झाली आहे. बांधकामाच्या अधिक वजनामुळे संरचनात्मक धोका, मालमत्तेचा कायदेशीर हक्क व पुनर्विकासातील अडथळे हे सर्वच प्रश्न निर्माण झाले आहे. गेल्या काही वर्षांत मुंबई आणि उपनगरांमध्ये अशा बनावट परवानग्यांवर आधारित फसवणूक प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. शासन व पोलीस यंत्रणांनी तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे, अन्यथा निष्पाप नागरिकांचे स्वप्नातील घर भयाच्या सावटाखाली येईल.