हर्सूलमध्ये पाडापाडी सुरु, वाहतूक ४ दिवस बंद राहणार; या मार्गे वाहतूक वळवली…

महाराष्ट्र

बीड: औरंगाबाद शहर ते सिल्लोड राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. आज सकाळपासून हर्सूल येथील संपादित मालमत्ता बांधकाम पाडण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. यामुळे हर्सूल गावातून वाहतूक चार दिवस बंद करण्यात आली आहे.

हर्सूल गावातील संपादित होणाऱ्या मालमत्ता बांधकाम पाडण्याची कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी १० फेब्रुवारीला जी २० च्या निमित्ताने झालेल्या बैठकीत दिले. त्यानुसार सोमवार (दि. १३) ते गुरुवारपर्यंत चार दिवस भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. दरम्यान, आज सकाळी गावातील मालमत्ता पाडापाडीचे काम सुरु झाले आहे. काही बाधित मालमत्ता मधील सामान नागरिकांनी स्वतःहून रविवारी काढून घेतले.

चार दिवस वाहतूक राहणार बंद

हर्सूल गावात येणारा व गावातून सावंगीकडे जाणारा रस्ता दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी बंद असणार आहे.

या मार्गे करता येणार वाहतूक…

औरंगाबाद शहरातून हर्सूल गावातून फुलंब्रीकडे जाणारी वाहतूक हर्सूल टी पॉईंटवरून आंबेडकरनगर चौक ते पिसादेवी बायपास अशी पुढे जाईल. फुलंब्री, सिल्लोडकडून हर्सूल गावात येणारी 1 वाहतूक सावंगी नाका येथून वळवून सावंगी बायपास मार्गे नारेगाव, वोखार्ड टी अशी पुढे जाईल. या सूचना अत्यावश्यक सेवा असलेल्या वाहनांसाठी लागू असणार नाहीत, असे सिडको वाहतूक शाखेचे निरीक्षक राजेश मयेकर यांनी कळविले आहे.