पोलिसांनी उधळला तब्बल ११० कोटींचा ऑनलाइन दरोड्याचा डाव; सहा जणांना अटक

महाराष्ट्र

उपसरपंच-किराणा चालकासह ६ जणाला अटक?

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या सायबर क्राईमच्या टीमने मोठी कारवाई करत, तब्बल ११० कोटींचा ऑनलाईन दरोड्याचा प्रयत्न उधळून लावला असून मुंबईतील हिरे विक्री करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय कंपनीचे बँक ऑफ इंडियात असलेले खाते हॅक करून ११० कोटी रुपये परस्पर वळते करायचे आणि त्यातून क्रिप्टो करन्सी खरेदी करण्याचा कट रचणाऱ्या एका रॅकेटचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला.

सहा आरोपी जेरबंद

अमोल साईनाथ करपे (वय २५, रा. कुडापूर झिंझुर्डी, ता. गंगापूर), शेख इरफान शेख उस्मान (वय २३, रा. मिटमिटा), वसीम इसाक शेख (वय ३६, रा. पडेगाव), शेख कानित शेख अय्युब (वय १९, रा. रूप महल, एसटी कॉलनी), अब्बास युनूस शेख (वय ३४, मिटमिटा), कृष्णा बाळू करपे (वय २५, रा. कुडापूर झिंझुर्डी, ता. गंगापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील अमोल करपे हा उपसरपंच, इरफानचे हॉटेल आहे, वसीम खासगी नोकरी, आब्बास युनूसचे वेल्डिंगचे आणि कृष्णाचे किराणा दुकान असल्याची माहितीही सायबर पोलिसांनी दिली.

नेमकं काय आहे प्रकरण…

सायबर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक प्रविणा यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिऱ्यांचा व्यवसाय करणाऱ्या एका कंपनीच्या बँक ऑफ इंडियाच्या कॉर्पोरेट बँक खात्यात उपलब्ध असलेले ११० कोटी रुपये काही जण हॅक करणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून १७ जूनला दुपारी दीडच्या सुमारास सायबर पोलिसांनी हॉटेल देवप्रिया येथे छापा मारून सहा जणांना ताब्यात घेतले. यातील इरफान शेखने बँक खात्याची माहिती काढली होती. वसीम इसाक शेख, अमोल साईनाथ करपे, कृष्णा करपे आणि अब्बास शेख हे सर्वर जण क्रिप्टो करन्सी विकल्यानंतर हे पैसे आपसात वाटणार होते.