बारामती: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्याची तारीख अखेर निश्चित झाली आहे. येत्या २४ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामती दौऱ्यावर येणार असून, विद्या प्रतिष्ठान परिसरात उभारण्यात आलेल्या प्रेरणास्थळाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तसेच विद्या प्रतिष्ठानमध्ये उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय संस्थेची पाहणीही पंतप्रधान करणार असल्याची माहिती आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी बारामतीतील नक्षत्र गार्डन येथील प्रेरणास्थळाची पाहणी केली. याठिकाणी सुरू असलेल्या तयारीची माहिती घेतल्यानंतर त्यांनी विद्या प्रतिष्ठानच्या मुख्यालयात पदाधिकारी आणि विश्वस्तांसोबत बैठक घेत दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेतला.
यावेळी युगेंद्र पवार, विठ्ठल मणियार, प्रताप पवार, प्रा. निलेश नलवडे, किरण गुजर, नीलिमा गुजर यांच्यासह संबंधित पदाधिकारी उपस्थित होते.
बुद्धांच्या विचारांना समर्पित प्रेरणास्थळ
बारामतीतील विद्या प्रतिष्ठान परिसरात उभारण्यात आलेले प्रेरणास्थळ तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या स्मृती आणि विचारांना समर्पित आहे. शांतता, समता आणि मानवतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या प्रेरणास्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.
प्रेरणास्थळी भगवान गौतम बुद्ध यांचा पुतळा उभारण्यात आला असून, विविध महापुरुषांची चित्रे तसेच त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा परिचय करून देण्यात आला आहे. याच प्रेरणास्थळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
शरद पवारांचे एआय रोबोटने केले स्वागत
दरम्यान, पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मुख्यालयात पोहोचलेल्या शरद पवारांचे स्वागत ह्युमनॉइड एआय रोबोटने केल्याने उपस्थितांचे लक्ष वेधले.
शरद पवार मुख्य इमारतीत दाखल होताच हा रोबोट त्यांच्या दिशेने चालत आला आणि यांत्रिक हात उंचावत त्यांचे स्वागत केले. पवार यांनीही रोबोटकडे पाहत ‘चला’ असे म्हटल्यानंतर रोबोट बाजूला झाला.
शरद पवार आणि एआय रोबोट यांच्यातील हा अनोखा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. एकीकडे मोदींच्या बारामती दौऱ्याची तयारी, तर दुसरीकडे एआय रोबोटकडून शरद पवारांचे स्वागत, यामुळे विद्या प्रतिष्ठानमधील हा प्रसंग विशेष लक्षवेधी ठरला आहे.