मुरादाबाद (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका उच्चशिक्षित सॉफ्टवेअर इंजिनिअरने आपल्या सख्ख्या बहिणीची चाकूने तब्बल ४० वेळा वार करून निर्घृण हत्या केली असून आईवरही प्राणघातक हल्ला केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक मल्होत्रा नावाच्या तरुणाने आपली जुळी बहीण हिमशिखा मल्होत्रा हिच्यावर चाकूने एकामागून एक ४० पेक्षा अधिक वार करून हत्या केली. या हल्ल्यानंतर त्याने आई नीलिमा मल्होत्रा यांनाही सोडले नाही. हार्दिकच्या हल्ल्यात आई गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हार्दिकचे पुण्यातील एका तरुणीसोबत इन्स्टाग्रामवर प्रेमसंबंध होते. सुमारे सात ते आठ महिन्यांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले होते. मात्र हे नाते आपल्या आई आणि बहिणीमुळे तुटले असा संशय हार्दिकला होता. याच रागातून त्याने हा भयंकर हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले.
ब्रेकअपनंतर हार्दिक नैराश्यात गेला होता. तो सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता, मात्र नोकरी सोडून युट्युबवर करिअर करण्याचा प्रयत्न करत होता. घरच्यांकडून त्याला समजावण्याचा प्रयत्न होत होता; मात्र हार्दिकला तो हस्तक्षेप वाटत होता.
६ मार्च २०२६ रोजी आई कामावर असताना हार्दिकने घरी असलेल्या बहिणीवर चाकूने हल्ला करून तिची हत्या केली. त्यानंतर आईला “सरप्राईज” देण्याच्या बहाण्याने ऑफिसमधून घरी बोलावून त्यांच्यावरही हल्ला केला. या घटनेमुळे संपूर्ण उत्तर प्रदेश हादरला असून पोलिसांनी आरोपी हार्दिकला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.