जिल्हा परिषद–पंचायत समिती निकालांचा थरार! नेत्यांच्या कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला

महाराष्ट्र राजकीय

पुणे: जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत असून, अनेक ठिकाणी अटीतटीची आणि लक्षवेधी लढत पाहायला मिळत आहे. यावेळी राजकीय नेत्यांच्या कुटुंबीयांचा सक्रिय सहभाग असल्याने निवडणुकीला वेगळीच रंगत आली आहे. पक्षीय संघर्षासोबतच वैयक्तिक आव्हाने आणि घराणेशाहीचा प्रभाव यामुळे निकालाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या प्रमुख पक्षांमध्ये अनेक तालुक्यांत तीव्र चुरस पाहायला मिळत असून, काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांनीही अधिकृत पक्षीय उमेदवारांना तगडं आव्हान दिलं आहे.

भोर

भोर तालुक्यातील उत्रौली-कारी गटातील लढत विशेष लक्षवेधी ठरली आहे. भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या स्वरूपा थोपटे या माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे मैदानात आहेत. दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार झाल्याने निकाल कोणाच्या बाजूने लागणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

शिरूर

शिरूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुजाता पवार यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. त्या माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी आणि जिल्हा परिषदेच्या माजी सभापती आहेत. त्यांच्या प्रचारामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून, निकालाबाबत मोठी उत्सुकता आहे.

जुन्नर

जुन्नर तालुक्यातील बोरी-खोडद गटात अपक्ष उमेदवार कविता पवार यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला थेट आव्हान दिले आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या सून आहेत. अपक्ष उमेदवारीमुळे पक्षांतर्गत तणाव निर्माण झाला असून, मतविभागणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आंबेगाव

आंबेगाव तालुक्यात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील आणि अरुण गिरे यांच्यात अटीतटीची लढत अपेक्षित आहे. येथे शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची युती असून, दोन्ही राष्ट्रवादी गट आमनेसामने उभे ठाकल्याने निकाल अनपेक्षित ठरण्याची शक्यता आहे.

खेड

खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनीता बुट्टे पाटील निवडणूक रिंगणात आहेत. त्या भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या शरद बुट्टे पाटील यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या विरोधात आमदार बाबाजी काळे यांच्या बहिण राजश्री जैद आणि शिंदेसेनेच्या निशा गोरे मैदानात असल्याने ही त्रिकोणी लढत खेडच्या राजकारणाला नवे वळण देऊ शकते.

दौंड

दौंड तालुक्यात खडकी गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे वीरधवल जगदाळे निवडणूक लढवत आहेत. ते दिवंगत माजी आमदार कृष्णराव जगदाळे यांचे पुत्र आहेत. तसेच बोरीपार्धी गटातून माजी आमदार रमेश थोरात यांचे पुत्र तुषार थोरात यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या ठिकाणी राजकीय वारशाचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो.

इंदापूर

इंदापूर तालुक्यात अंकिता पाटील दुसऱ्यांदा निवडणूक लढवत असून त्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत. यावेळी त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून मैदानात उतरल्या आहेत. तसेच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पुत्र श्रीराज भरणे यांनाही पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. या लढतींचा निकाल जिल्ह्यातील सत्ता समीकरणांवर मोठा परिणाम करू शकतो.