sharad pawar

समाजात वाचनसंस्कृती किती रुळली त्यावर त्याच्या सांस्कृतिक पातळीची उंची  ठरते; खासदार शरद पवार

महाराष्ट्र

मुंबई: एखाद्या समाजात वाचनसंस्कृती किती रुळली आहे त्यावर त्याची सांस्कृतिक पातळी किती उंचीची ते ठरते” असे विचार संस्थेचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री खा शरद पवार यांनी व्यक्त केले. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष सांगता समारंभ दादर येथील संस्थेच्या शारदा मंगल सभागृहात थाटात संपन्न झाला. यावेळी शरद पवार बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हिंदीतील ख्यातनाम साहित्यिक विचारवंत अशोक वाजपेयी उपस्थित होते.

मुंबईचे केंद्रस्थान अशा दादरमधील  सायंकाळ ही साहित्यचर्चेने रसरसलेली ठरली. उभे राहाण्यासही जागा नाही, अशा खच्चून भरलेल्या सभागृहात साहित्य रसिक आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय संस्थेच्या सर्व वयोगटातील साहित्य रसिकांची उपस्थिती होती. अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी रानकवी ना. धो. महानोर यांचे स्मरण करून भाषण सुरू केले. आपले राजकीय गुरू राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा उल्लेख त्यांनी भाषणातून केला. पवार म्हणाले, चव्हाण साहित्यप्रेमी होते. त्यांच्या इच्छापत्रानुसार त्यांच्या खासगी २८ हजार ग्रंथसंपदेचे ग्रंथालयात रूपांतर केले, आज त्याचा लाभ ग्रामीण भागातील युवावर्ग घेत आहे. प्रत्येकाने वाचून झालेली पुस्तके ग्रंथालयात द्यावीत, असे आवाहन त्यांनी केले. सध्या बंद असलेली शारदा चित्रपटगृहाची इमारत दुरुस्ती व सुधारणा करून त्यातून उपलब्ध रकमेतून हे ग्रंथालय अधिक सुसज्ज करु, प्रत्येकाने आपल्याकडे असलेली पुस्तके वाचून झाली की ग्रंथ संग्रहालयाला द्यावीत! “असे आवाहन ही पवार यांनी केले. “संविधानिक संस्थांचे नैतिक अध:पतन होत आहे, अशावेळी साहित्याने निर्भय होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अशोक वाजपेयी यांनी केले.

मी महाराष्ट्रात परभणी येथील साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभाला पहिल्यांदा गेलो होतो,  तेव्हा एवढा मोठा जनसमुदाय बघून दंग झालो आमच्या हिंदीमध्ये मराठी पेक्षा जास्त लोकसंख्या आहे, लिहिणारे लोक आहेत पण इतका मोठा जनसमुदाय आम्ही साहित्य मंडपात कधी पाहिला नव्हता.

ते पुढे म्हणाले की” महाराष्ट्राने शास्त्रीय संगीताची परंपरा अजूनही जोपासली आहे. खरं तर जवळपास ही सगळीच घराणी आमच्या हिंदी भागातील पण आम्ही ती विसरत चाललो आहोत. एवढचं नव्हे तर आधुनिक रंगमंच,कला,सिनेमा, साहित्य यातही महाराष्ट्र अग्रेसर आहे.भारतीय स्वातंत्र्याच्या पाश्र्वभूमीवर “प्रोग्रेसीव्ह आर्टिस्ट ग्रुप ” ची स्थापना हिन्दू, मुस्लिम आणि ख्रिश्चन अशा पाच मित्रांनी केली होती. मी काही वर्ष महात्मा गांधी विद्यापीठाचा कुलपती म्हणून काम केले आहे. मी अतीशय आत्मविश्वासाने सांगतो की गांधीच्या विचारांना मारायचे काम आजचे राजकारणी करत आहेत. ही खुपच खेदजनक बाब आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत स्री, अपंग, मुली, दलीत यांच शोषण, हत्या, हिंसा व बलात्कार हे 70 % हिन्दी भाषीय प्रदेशात होत आहेत.

एकूणच देशात खोट्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या वाढत असून, खोटे बोलणा-यांची संख्याही कितीतरी पटीत वाढत आहे ही गोष्ट खुपच चिंताजनक असून, आपण काय खावं, कोणते कपडे घालावेत, काय बोलावं यावर सुद्धा लक्ष ठेवलं जाऊ लागलं आहे. आज राजकारणी धर्माचा प्रसार, प्रचार करीत आहेत. आपल्या संपूर्ण आयुष्यावर राजकारणाचा प्रभाव खुपच मोठा आहे. आणि मिडीया सरकारला प्रश्न न विचारता विरोधी पक्षातील लोकांना प्रश्न विचारत आहे. अशा शब्दात  परिस्थितीवर नेमकं भाष्य करतांना पुढे म्हणाले की, आज बात बहोत चिंताजनक बन गई है सत्य पर यकिन करनेवाले और बोलनेवाले बहोत ही कम है हमारे यहाॅ पहले संविधान सामाजिक धर्म था अब धर्म सामाजिक संविधान बन गया है नष्ट करदेनेका उत्साह बढ रहा है लोकतंत्र को अब प्रजा मे बदलने की कोशिश की जा रही है इसलिए सचपर अडे रहकर अभिव्यक्त होना यही साहित्य का सबसे बडा पुरस्कार है, असेही स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

आपल्या सडेतोड पण वादग्रस्त विधानासाठी प्रसिद्ध असलेले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ भालचंद्र नेमाडे म्हणाले की, “ग्रंथालये ही महासागरातील बेटे असतात. आत्मविश्वास हा वाचनातून येतो. ही संस्था अशीच आहे. या संस्थेत विद्यार्थी दशेत अभ्यास केला आहे. जगातील साऱ्या क्रांती या साहित्य वाचनातून घडल्या. या देशात प्राचीन काळी तक्षशिला ते चोल साम्राज्यपर्यंत २५ विद्यापीठे होती. आज कशाचा अभिमान बाळगायचा, एक लाख महिलांवर अत्याचार होतात याचा? असा सवालही नेमाडे यांनी केला.

पेशव्यांनी पराभव पत्करून आपले राज्य इंग्रजांच्या स्वाधिन केले ते एका अर्थाने चांगलेच झाले. इंग्रज वाईटच होते पण पेशवेही काही चांगले नव्हते. यात सर्वात वाईट गोष्ट कोणती असेल तर आपलीच माणसे आपलेच आर्थिक, सामाजिक, लैंगिक शोषण करीत होते. आणि आज जर देशातील  घडणा-या घटनांकडे दृष्टिक्षेप टाकला तर एक गोष्ट लक्षात येते की आजची परिस्थिती भयानक आहे.आजच्या पिढीने परिस्थितीत बदल घडवून आणला पाहीजे आणि त्यासाठी ग्रंथ वाचले पाहीजेत, ग्रंथालय वाचवली, वाढवली पाहीजेत. तिथेच आपणांस खरे ज्ञान मिळते. अर्थात काही ग्रंथ खोट्याचाच प्रचार, प्रसार करतांना दिसतात.

विवेकांने विचार केल्यास व वाचत गेल्यास खरं काय, खोटं काय हे कळण्यास नक्कीच मदत होईल यात वाद नाही,म्हणून वाचत चला. संपूर्ण आयुष्य खर्चून ख-या ज्ञानाचा एक कण जरी मिळाला तरी स्वतःला भाग्यवान समजा.” प्रमुख कार्यवाह रविंद्र गावडे यांनी सर्व मान्यवर व उपस्थितांचे आभार मानले. कार्यवाह उमा नाबर, शिल्पा पितळे,  कार्याध्यक्ष शीतल करदेकर, कोषाध्यक्ष जयवंत गोलतकर, प्रदीप ओगले यांनी  मान्यवराचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या कार्यक्रमास  माध्यम प्रतिनिधि ,साहित्यिक, ग्रंथालयाचे सभासद, इतर ग्रंथलयाचे प्रतिनिधि, विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली.

मुंबई मराठीग्रंथसंग्रहालयाला विशेष ग्रंथालयाचा दर्जा  आणि १२५ वर्षाच्या निमित्ताने १२५कोटीरुपये द्यावेत; डॉ भालचंद्र मुणगेकर

“मी प्लॅनिंग कमिशनला असताना असं दिसून आलं की, दक्षिणेकडील आंध्र केरळ कर्नाटक तामिळनाडू  या चार राज्यानी साहित्य संस्कृती  कला संवर्धनासाठी काम केले आहे तसे काम महाराष्ट्रात दिसत नाही. साहित्य संस्कृती कला संवर्धन कामी या ४ राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र त्यांच्या जवळपासही फिरकू शकत नाही इतकी उदासीनता  महाराष्ट्रात आहे, असे प्रतिपादन संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर यानी प्रास्ताविकात केले.

ते पुढे म्हणाले की, “परवा शंभर कोट रुपये विदर्भ साहित्य संघाला उपमुख्यमंत्र्यांनी दिले ,त्याचा मला अभिमान आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाला तीन वर्षापूर्वी पुस्तकांचे डिजिटायझेशन करण्यासाठी पाच कोटी रुपये मंजूर केले होते त्यातील साडे तीन कोटी रुपये केवळ आम्ही  त्या तारखेपर्यंत टेंडर काढले नाही म्हणून  ब्लॉक करण्यात आले.

राजकीय वाद टीकाटिपणी होत राहतील पण  महाराष्ट्र सरकारने अशा  विषयात व्यापक दृष्टिकोन ठेवून  सहकार्य केले पाहिजे, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या  125 व्या वर्षाच्या  निमित्ताने महाराष्ट्र सरकारने 125 कोटी रुपये द्यावेत, अशी  आपल्या सर्वांच्या  वतीने मी महाराष्ट्र सरकारकडे मागणी  करतो. तसेच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे  मुंबई या नावामुळे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाला  जिल्हा ग्रंथालयाचा दर्जा दिला आहे. सहालाख पुस्तके  आणि ३५० वर्षाची मोठी संपदा आणि जे महाराष्ट्राचे भूषण आहे, अशा ग्रंथालयाला विशेष स्वतंत्र कॅबिनेट बैठक घेऊन विशेष दर्जा देण्याची गरज आहे आणि ते महाराष्ट्र सरकार देईल असा विश्वास आहे आणि यासाठीचे नेतृत्व मा खा शरद पवार करतील याची खात्री आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला