‘डुबता महाराष्ट्र’ करण्याचे पाप महायुती सरकारचे; जनता माफ करणार नाही;  हर्षवर्धन सपकाळ

महाराष्ट्र

मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी “उडता पंजाबप्रमाणे ‘डुबता महाराष्ट्र’ करण्याचे पाप महायुती सरकार करत असून, राज्यातील जनता त्यांना कधीच माफ करणार नाही,” असा इशारा दिला.

मुंबईतील टिळक भवन येथे माध्यमांशी संवाद साधताना सपकाळ यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले. त्यांनी सांगितले की, ड्रग्जचे जाळे आता मुंबई-पुण्यासारख्या शहरांपुरते मर्यादित न राहता तालुक्यांपर्यंत पोहोचले आहे. गुजरातमधील कांडला बंदरातून महाराष्ट्रात येणाऱ्या ड्रग्ज कॉरिडॉरकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

तुळजापूरसारख्या पवित्र स्थळाशी संबंधित नगराध्यक्षावर ड्रग्ज रॅकेटचे आरोप असूनही त्याला सत्ताधाऱ्यांकडून उमेदवारी देण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातेवाईकाच्या शेतात ड्रग्ज कारखाना आढळल्याचा दावा करत, या प्रकरणात हस्तक्षेप करून आरोपींना वाचवण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

मुंबईतील नेस्को परिसरात पोलिस स्टेशनसमोरच ड्रग्ज व दारू पार्टी होत असल्याचा उल्लेख करत सपकाळ यांनी हे गृहमंत्रालयाच्या अपयशाचे द्योतक असल्याचे म्हटले. राज्याचे गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप त्यांनी केला.

याशिवाय अशोक खरात प्रकरण, नाशिकमधील आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि अमरावतीतील अत्याचार प्रकरणांचा उल्लेख करत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. नाशिक प्रकरणातील एफआयआर सार्वजनिक करण्याची मागणी करत सर्व प्रकरणांत कठोर कारवाईची गरज त्यांनी व्यक्त केली.राज्यात पूर्णवेळ गृहमंत्री नसल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली असून, देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देऊन सक्षम पूर्णवेळ गृहमंत्री नेमावा, अशी मागणीही सपकाळ यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत