सोलापुरात दिग्गजांच्या नातेवाईकांत रंगली चुरशीची लढत
सोलापूर: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे कल हळूहळू स्पष्ट होत आहेत. सकाळी ११ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्हा परिषदेत भाजपने आघाडी घेतली आहे. भाजप ७५ जागांवर आघाडीवर असून शिवसेना ४१, राष्ट्रवादी काँग्रेस ४६, काँग्रेस २२, ठाकरे गट १५ तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ५ जागांवर आघाडीवर आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात दिग्गजांच्या नातेवाईकांमध्ये जोरदार शर्यत पाहायला मिळाली. दहिगाव जिल्हा परिषद गटात भाजपने मोठी मुसंडी मारली आहे. भाजप आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार उत्तमराव जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांचा पराभव करत विजय मिळवला.
विशेष म्हणजे, दहिगाव जिल्हा परिषद गटातील दोन्ही पंचायत समितीच्या जागांवरही भाजपने विजय मिळवला आहे. याचबरोबर माळशिरसमधील गुरसाळे गणातून अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. त्यामुळे मोहिते-पाटीलांच्या बालेकिल्ल्यात भाजपने गुलाल उधळल्याचं चित्र आहे.राज्यातील इतर जिल्ह्यांमधील निकालांकडेही सर्वांचे लक्ष लागले असून, अंतिम निकालांनंतर राजकीय समीकरणं अधिक स्पष्ट होणार आहेत.