गुनाट येथे हंगेवाडी येथील हंगेश्वराच्या लग्नाची वरात साजरी

महाराष्ट्र

शिंदोडी (तेजस फडके): श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी येथे नुकतीच हंगेश्वराची यात्रा पार पडली. या यात्रेत जवळपासच्या अनेक गावातील भाविक मोठया प्रमाणात येतात. त्यापैकी शिरसगाव, चिंभळे, गुनाट या गावांना यात्रेत विविध मान सन्मान मिळतो. शिरुर तालुक्यातील गुनाट येथील भगत परिवारातील वशंज यांना देवाधिदेव महादेव प्रसन्न झाले होते. देवासाठी गुनाट येथुन हंगेवाडी पर्यंत पिण्यासाठी पाणी घेऊन ते गेले होते देव पुढे व भक्त मागे असे करत करत हंगेवाडी येथे जाऊन देव थांबले आणि प्रसन्न होऊन आशिर्वाद मागितला असता भक्ताने पिंडीवर पाणी घालण्याचा पहिल्या धारेचा मान मागितला. तेव्हापासून तो आजपर्यंत अविरतपणे हंगेवाडीच्या यात्रा उत्सवात पहिल्या धारेचा मान भगत परिवारास दिला जात आहे.

तसेच या यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे काटेमोड तसेच देवाचे लग्न असून भगत परिवारास देवक घेऊन जाण्याचा मान हि हंगेवाडी येथे मिळतो. त्यामुळे गुनाट येथील भगत परिवार रात्रभर हंगेवाडीत मुक्काम करतात आणि सकाळी महादेवाच्या पिंडीवर पाण्याची धार घालुन परत येतात. कुटुंबातील जेष्ठ व तरुण पिढीने आजही ती परंपरा चालू ठेवली असुन यात्रेच्या दुसऱ्या दिवशी देवाची वरात काढण्याचा मान हि भगत परिवारास असल्याने मोठ्या उत्साहाने गुनाट येथे महादेवाच्या लग्नाची वरात काढण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी करत वाजंत्री यांच्यासह सर्वच भगत परिवार मोठ्या हिरीरीने यात सहभाग होतो.

तसेच महिला भगिनी कावडीचे पुजन करतात गुनाट गावात महादेव मंदीर जीर्णोद्धारचे काम चालू असुन भविष्यात हा उत्सव मोठ्या स्वरूपात करण्याचा भगत परिवाराचा मानस असल्याचे संतोष भगत यांनी सांगितले. भगत परिवारातील कांतीलाल भगत, विठ्ठल भगत, लतेश भगत यांनी हिरीरीने सहभाग घेऊन भगत परिवारातील महादेव भक्त यांची असलेली हंगेवाडी येथे असलेल्या समाधिचा सर्वांच्या सहकार्याने जीर्णोद्धार केला आहे.