शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याला आळा घालण्यासाठी शिरूर पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त पथकाने अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक कारवाई केली आहे. बाबुरावनगर, शिरूर परिसरात एमडी (मेफेड्रॉन) या अमली पदार्थाची विक्री होणार असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती मिळाल्यानंतर राबविण्यात आलेल्या छाप्यात तब्बल १ किलो ५२ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण २ कोटी १० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून शादाब रियाज शेख (वय ४१, रा. शिरूर) या आरोपीस अटक करण्यात आली आहे.
शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १७ जानेवारी २०२६ रोजी रात्री पेट्रोलिंग सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय बातमीद्वारे ही माहिती समोर आली. सदर माहिती तात्काळ शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांना कळविण्यात आली. त्यांनी ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार एनडीपीएस कायद्याच्या कलम ४२ अन्वये आवश्यक ती परवानगी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले (शिरूर उपविभाग) यांच्याकडून दूरध्वनीद्वारे घेण्यात आली.
View this post on Instagram
यानंतर छाप्यासाठी पंच, छायाचित्रकार, वजनकाटा व पंचनाम्यासाठी लागणारे साहित्य बोलावून घेण्यात आले. पंच म्हणून नितीन बाद्ध गरदाळे (वय २१) व रामदास गेरोबा अरदवाड (वय ३८) यांची उपस्थिती निश्चित करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक पंडित मांजरे, पोलिस हवा.निलेश शिंदे, जनार्दन शेळके, तुषार पंधारे, राजू मोमीन, संजय जाधव तसेच मुख्यालय पुणे येथील पोलिस कॉन्स्टेबल पोपट गायकवाड, शिरूर पोलिस ठाण्याचे पो. उप.नि. दिलीप पवार, अंबादास थोरे, सचिन भोई आदी अधिकारी व कर्मचारी पथकात सहभागी होते.
१७ जानेवारी २०२६ रात्री सुमारे १२.१० वाजण्याच्या सुमारास बाबुरावनगर येथील मोकळ्या मैदानाजवळ सापळा लावण्यात आला. त्यावेळी काळ्या रंगाच्या हिरो होंडा पॅशन दुचाकीवरून आलेल्या इसमास थांबविण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव शादाब रियाज शेख असल्याचे सांगितले. त्यास एनडीपीएस कायदा कलम ५० अंतर्गत त्याचे हक्क समजावून सांगून पंचांसमक्ष अंगझडती घेण्यात आली. त्याच्याकडील बॅगमध्ये एमडी (मेफेड्रॉन) हा अमली पदार्थ आढळून आला. वजन केले असता त्याचे वजन १ किलो ५२ ग्रॅम इतके भरले. आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार जप्त एमडीची किंमत सुमारे २ कोटी १० लाख ४० हजार रुपये असून आरोपीकडील दुचाकी, मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण २ कोटी १० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व मुद्देमाल पंचनाम्याने सीलबंद करून ताब्यात घेण्यात आला आहे.
View this post on Instagram
या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत कलम ८(क), २९ प्रमाणे सरकारतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या कारवाईमुळे शिरूर तालुक्यातील अमली पदार्थ विक्री साखळीला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
मोठा कट उघड! शिरूर भूमी अभिलेख कार्यालयातील ३ कर्मचाऱ्यांसह दहा जणांवर गंभीर गुन्हे दाखल…
शिरूर! पंचनाम्याच्या बदल्यात ‘दर ठरवला’; लाच घेताना ग्राम महसूल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात…
शिरूर तालुक्यातील स्वयंघोषित नेत्याला कुणीतरी आवरा हो…? माजी सैनिकाचा संताप…
शिरूर तालुक्यात वाढती गुन्हेगारी चिंताजनक; ‘सिंघम’ पोलिस अधिकाऱ्याची गरज…
मोटार सायकल चोरी करणाऱ्या शिरूर तालुक्यातील सराईत टोळीस अटक…