पार्थ पवारांना शपथविधी सोहळ्यापासून दूर का ठेवल

महाराष्ट्र राजकीय

सुनेत्रा पवारांचा इतिहास रचणारा शपथविधी; महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

मुंबई: राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनात पार पडलेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यासह सुनेत्रा पवार यांना महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला आहे.

शपथविधीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुंबईत आपल्या सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत एकमताने सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर उपमुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव अंतिम करण्यात आलं.

या बैठकीत दोन महत्त्वाचे प्रस्ताव मांडण्यात आले होते. पहिला प्रस्ताव सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड करण्याबाबत होता, तर दुसरा प्रस्ताव पक्षाशी संबंधित सर्व निर्णय घेण्याचे संविधानिक अधिकार सुनेत्रा पवार यांना देण्यासंदर्भात होता. हे दोन्ही प्रस्ताव आमदारांच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आले.

दरम्यान, शपथविधी सोहळ्यात पार्थ पवार कुठेही दिसून न आल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही कौटुंबिक कारणांमुळे आणि पुढील विधींसंदर्भात शरद पवार यांनी पार्थ पवार यांना बारामतीतच थांबण्यास सांगितले होते. त्यामुळे ते शपथविधीला उपस्थित राहू शकले नाहीत, अशी माहिती समोर येत आहे.

शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदासोबतच इतर तीन महत्त्वाची खातीही देण्यात आली आहेत. त्यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्यांक ही खाती सोपवण्यात आली आहेत. मात्र, अर्थ खाते त्यांना देण्यात आलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्थ खाते आपल्याकडेच ठेवण्यासाठी भाजप आग्रही असून राष्ट्रवादीकडूनही या खात्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात अर्थ खात्याबाबत काय निर्णय घेतला जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सध्या हे खाते मुख्यमंत्रीांकडेच राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.