ST

रांजणगाव, शिरूर येथील प्रवाशांना एसटी बस मध्ये बसण्यास नाकारू नये…

महाराष्ट्र

पुणे (सुनिल सांबारे): पुणे येथून राज्यभरातील विविध भागांमध्ये एसटी बस धावतात. पण, पुणे येथून सुटणाऱ्या एसटी बसेसमध्ये रांजणगाव, शिरूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना नाकारले जात असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या होत्या. पण, रांजणगाव, शिरूर येथील प्रवाशांना बस मध्ये बसण्यास नाकारू नये, असे आदेश एसटी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

शिवाजीनगर मधून जाणाऱ्या बस बाबत अनेक प्रवाशांच्या तक्रारी अशा आहेत की, शिवाजीनगर मध्ये शिरूर वरून नगरला जाणाऱ्या बस मध्ये बसण्यासाठी आले असता शिरूर येथील प्रवाशांना नाकारले जाते. कारण विचारले असता चिडून धावून अंगावर येणारे वाहक असतात. बस शिरूरला जात नाही आणि नगरला जाण्यासाठी रांजणगाव शिरूर मार्गे जावे लागत असल्याचे कारण पुढे केले जाते.

रांजणगाव मध्ये मोठी एमआयडीसी असून सुद्धा काही वाहक तेथील प्रवाशांना का बसून देत नाहीत? रांजणगाव येथे पण एसटीचा थांबा आहे. परंतु, तेथील सर्वच प्रवाशांना का नाकारले जाते? याचे कारण अद्याप कोणालाही उमगले नाही. याबाबत एका एका वाहकांना विचारले असता त्यांचे उत्तर आले की, अगोदर लांबच्या प्रवासी बसू दिले जाते. मग असे असेल तर जवळच्या प्रवाशांनी काय करायचं? एसटी बस फक्त लांबच्या पल्यांसाठीच आहेत का? असाही प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

शिवाजीनगर व्यवस्थापक ज्ञानेश्वर रणवरे आगार व्यवस्थापक वरिष्ठ यांना भेटून याबाबत सविस्तर चर्चा केली असता ते म्हणाले की, ‘प्रत्येक गाडी शिरूर बस स्टॅन्ड मध्ये एन्ट्री केल्यानंतरच पुढे जाईल. शिवाय विना वाहक गाडी ही बायपास मार्गे जाईल, असे सांगितले आहे. पण, काही वाहक असे करताना निदर्शनास आले तर त्याबाबत कारवाई केली जाईल. संबंधितांना तशा सूचनाही तात्काळ दिल्या की रांजणगाव शिरूर येथील प्रवाशांना बस मध्ये बसण्यास नाकारू नये.’