शिंदे सरकारचा महाविकास आघाडीला आणखी एक धक्का…

राजकीय

मुंबई: बारामतीमध्ये साकार होणार असणारा बिबट्या सफारी प्रकल्प आता जुन्नर इथे साकारण्याचा निर्णय घेत शिंदे सरकारने महाविकास आघाडीला आणखी एक धक्का दिला आहे.

महाविकास आघाडी सरकारने हा प्रकल्प बारामतीमध्ये साकारण्याबाबतचा निर्णय घेतला होता. शिंदे सरकारने महाविकास आघाडी सरकारचा हा निर्णय बदलला आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी बारामती बिबट्या सफारी या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात 60 कोटी रुपयांच्या तरतुदीची घोषणा केली होती. पर्यटनाला चालना देण्यासाठी या सफारीची योजना करण्यात आली आहे.

हा प्रकल्प बारामतीकडे गेल्यावर शिंदे गटातील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आक्षेप घेतला होता. ‘जुन्नरचे आमदार-खासदार झोपेत आहेत, तुमच्या डोळ्यादेखत बिबट्या सफारी प्रकल्प बारामतीला गेला कसा’, अशा शब्दांत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी टीका केली होती. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसची थापेबाजी आणि बोगसगिरी उघडी पडत असल्याचे ते म्हणाले होते.

दरम्यान, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येताच महाविकास आघाडीचे अनेक निर्णय रद्द केले गेले आहेत. यातच आता शिंदे सरकारने हा प्रकल्प जुन्नरमध्येच साकारला जाणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे, महाविकास आघाडीसाठी हा आणखी एक धक्का असल्याचे मानले जात आहे.