…म्हणुन आम्ही राजकीय पक्षांचा नाद सोडून दिला हे सरकार पाच ते सहा महिन्यात पडेल

राजकीय

शिरुर तालुक्यात शेतकरी संघटनेची ऊस परिषद संपन्न

शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या सरकार मध्ये बदल झालेले असून सरकारचे काहीही खरे नसून जसे चोरांच्या चोऱ्या करण्यासाठी जुळवाजुळव सुरु असते तसे राज्यकर्त्यांची सत्ता मिळवण्यासाठी जुळवाजुळव सुरु असून हे सरकार चालवण्याच्या लायकीचे नसून आम्ही राजकीय पक्षांचा नाद सोडून दिला असून हे सरकार 5 ते 6 महिन्यात पडेल असे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या जयंती निमित्ताने आयोजित ऊस परिषदेदरम्यान बोलताना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील हे बोलत होते. याप्रसंगी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष अजित काळे, कार्याध्यक्ष कालिदास आपेट, क्रांतीसिंह ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजीराव नांदखिले, पच्छिम महाराष्ट्र अध्यक्ष पांडुरंग रायते, उपाध्यक्ष बाळासाहेब घाडगे, महाराष्ट्र राज्य युवा आघाडी अध्यक्ष रामेश्वर गाडे, हनुमंत वीर, पुणे जिल्हाध्यक्ष बाबा हरगुडे, वस्ताद दौंडकर यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना शेतकऱ्यांना कमी पैसे देता आणि दुसरीकडे साखर कारखान्यांवर कोट्यावधी रुपये कर्ज करुन ठेवता, तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे अशा शब्दात साखर कारखानदारांवर घणाघात करत काय झाडी, काय डोंगर वरून देखील सरकारवर निशाना साधला तसेच हे सरकार पाच सहा महिन्यात पडेल व कोण कोणाच्या गळ्यात पडेल काही सांगता येत नाही असे देखील पाटील यांनी सांगितले.

यावेळी दोन साखर कारखाने व इथेनॉल कारखान्यांमधील अंतरांची अट रद्द झाली पाहिजे, कांदा, बटाटा वरील निर्यातबंदी कायमस्वरुपी हटली पाहिजे, सातबाऱ्यावरील पुनर्वसनचे शिक्के हटले पाहिजे, शेतकऱ्यांचे कर्ज व वीजबिल माफ झाले पाहिजे या मागण्या करण्यात आल्या असून शेतकऱ्यांच्या बाजूने कोणताही पक्ष राहिलेला नसून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर शेतकऱ्यांचे सरकार आले पाहिजे, अशी देखील अपेक्षा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केली.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल कदम यांनी केले, तर शेतकरी संघटनेचे पच्छिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळासाहेब घाडगे यांनी आभार मानले.