शिरुर तहसिल कार्यालयात चक्क रात्रीस खेळ चाले…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर: शिरुर तहसिल कार्यालय हे आधिकाऱ्यांमुळे चक्क रात्रीच्या वेळी सुरु होत असून आर्थिक मलिदा दिलेल्या अनेक फायलींवर तहसिलदारांच्या सह्या होत असल्याचे नागरीकांनी सांगितले आहे.

तहसिलदार यांची बदली होणार असल्याचे संकेत मिळत असल्याने गौणखणिज केसेस, रस्ता केसेस, १५५ च्या केसेस बंद होऊन जाता जाता फाईलवर सही घेण्यासाठी तहसिल कार्यालयात गर्दी वाढू लागली आहे. दोन दिवसात रात्रीच्या वेळेस अचानक सह्या केलेल्या फाईलची चौकशी लावणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी सांगितले. तसेच काही दाक्षिणा न दिलेल्या फाईल तश्याच धुळ खात पडल्या आहेत. शेतकऱ्यांच्या रस्ता खुला करण्याच्या फाईल तहसिलदार यांनी मुद्दामहून अडवून ठेवल्या असून शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारात असल्याचे केदारनाथ वाघोले यांनी सांगितले आहे.

तहसिल कार्यालयात तहसिलदार दिवसा उपस्थित नसतात. मात्र रात्रीच्या वेळी अचानक हजर होऊन संबधित आस्थापनेच्या कर्मचाऱ्यांना बोलवून घेत फाईलवर सहया होत असल्याने रात्रीस चांगलाच खेळ चालत असल्याचे एका जागरुक नागरीकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे. शिरुर तालुक्यातील जनतेचे कामावाचून प्रचंड हाल होत असून जिल्हाधिकाऱ्यांनी प्रभारी तहसिलदांराऐवजी नवीन तहसिलदारांची लवकर नेमणुक करणे गरजेच असल्याची चर्चा शिरुर तालुक्यातील नागरीक करत आहे.