शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी येथे किराणा दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी तब्बल 26 लाखाचे नुकसान

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) टाकळी हाजी (ता.शिरुर) येथे सागर किराणा स्टोअर्स या दुकानाला आज गुरुवार (दि.२) रोजी पहाटेच्या सुमारास शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली.आग लागल्याने मोठ्या प्रमाणात किराणा माल व दुकानातील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असुन या दुर्दैवी घटनेत सुमारे 26 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

 

टाकळी हाजी येथील दत्तात्रय नानाभाऊ कांदळकर यांच्या दुकानाला आज गुरुवार (दि 2) रोजी पहाटे आग लागली. यावेळी गावातील मळगंगा मंदिरात पालखी जवळ असलेले भक्त जयसिंग शिंदे यांना दुकानातून धुर येत असल्याचे दिसल्याने त्यांनी दुकानाचे शटर उघडण्याचा प्रयत्न केला असता. त्यांनाही वीजेचा धक्का बसला. त्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांना आवाज देवून मदतीचे आवाहन केले. आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात पेटल्यामुळे शेजारीच झोपलेले कांदळकर कुटुंबाला जाग आल्याने ही घटना निदर्शनास आली.

 

परंतु काही करण्याच्या आधीच सगळे दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. दुकानातील सर्व किराणा साहित्य, फ्रीज, दुकानात लावलेली मोटासायकल तसेच किचन व त्यातील सर्व भांडी व साहित्य तसेच त्यांचे महत्वाचे कागदपत्र जळून खाक झाल्याचे दुकानदार कांदळकर यांनी सांगितले. त्यांचे सर्व कुटुंब दुकानाच्या शेजारील खोलीत झोपले होते. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली.

 

या दुर्दैवी घटनेची माहिती समजताच टाकळी हाजी चे माजी सरपंच दामुशेठ घोडे, पोलीस पाटील शोभा मंदिलकर, विनोद बोखारे, मयुर मंदिलकर, संतोष गावडे, दत्ता गावडे, अशोक कांदळकर, विक्रम घोडे, निकीता गावडे, सागर कांदळकर यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

 

माजी आमदार पोपटराव गावडे यांनी घटना स्थळी भेट देत शिरुरच्या तहसीलदारांशी संपर्क साधत पंचनामा करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. विद्युत अभियंता राजेंद्र इंगळे, तलाठी ज्ञानेश्वर चौधरी, ग्रामसेवक राजेंद्र खराडे यांनी पंचनामा केला आहे.

 

सदर जळीताची घटना ही खूप मोठी असून यात लाखो रुपयाचे नुकसान झाले असून सरकारी पातळीवर मदत मिळणे आवश्यक आहे.तसेच दुकानाचे मालक दत्तात्रय कांदळकर यांची आर्थिक परिस्थिती गरीब असून त्यांना स्थानिक पातळीवर आर्थिक मदत करावी असे आवाहन माजी आमदार पोपटराव गावडे यांनी केले.

 

मळगंगा परिसरात विजेच्या तारांचे जाळे… 

टाकळी हाजी येथील मळगंगा मंदिर व परिसरात विजेच्या खांबाची उंची कमी आहे परिणामी विजेच्या तारा कमी उंचीवर लोंबकळत आहेत येणारी वाहने व तारांचा संपर्क होवून दुर्घटना घडू शकते विजेच्या खांबांची उंची वाढवावी तारांचे जाळे कमी करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

न्हावरे येथील घोडगंगा कारखान्याच्या भंगाराला आग; अग्निशमन दलाच्या जवानांमुळे वेळीच आग आटोक्यात