शिरुर पोलिसांनी १८ लाख रुपयांची फसवणुक करणाऱ्या आरोपीला केले तब्बल दोन वर्षांनी अटक

क्राईम मुख्य बातम्या

सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर आणि सहकाऱ्यांची कामगिरी

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुरमधील एका डॉक्टरांना सिटी स्कॅन मशीन देतो असे म्हणून सुमारे १८ लाख रुपये घेऊन फसवणूक करुन पोबारा करणाऱ्या आरोपीच्या तब्बल दोन वर्षांनी शिरुर पोलिसांनी उत्तरप्रदेश येथे जाऊन मुसक्या आवळत फिर्यादी यांना त्यांची सर्व रक्कम परत मिळवून दिली आहे. यामुळे शिरुर पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पवनकुमार पिता श्रीचंद (वय २९) रा. कोशिकला रुरल, मथुरा, उत्तरप्रदेश असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरुर येथे अमोल आबासाहेब खोडदे (रा.शिरुर) हे डॉक्टर असून त्यांचे सिटी स्कॅन सेंटर आहे. आरोपी पवनकुमार याने डॉक्टर खोडदे यांना नवीन सी टी स्कॅन मशीन घेऊन देतो असे सांगत टप्प्याटप्प्याने १८ लाख २० हजार रुपये रक्कम स्वतःच्या बँक खात्यात जमा केली होती. सन २०२१ पासून आरोपी पैसे तसेच मशीन ही देत नसल्याने अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

 

त्यानंतर दोन वर्षांपासून आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना देखील गुंगारा देत होता. दरम्यान शिरुर पोलिस हे आरोपीच्या शोधात होते. अखेर एका गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना आरोपीच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे पोलिसांनी सखोल चौकशी सुरु केली. दरम्यान पोलिसांनी आरोपीची खातरजमा करत फसवणूक करणारा आरोपी हाच असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर थेट चार दिवस दिवस रात्र प्रवास करत मथुरा,कोशिकला असा मागोवा घेत आरोपीला ताब्यात घेतले. याकामी स्थानिक पोलिसांनी मोठी मदत केली. दरम्यान आरोपीकडून फसवणूक झालेली सर्वच्या सर्व रक्कम १८ लाख २० हजार रुपये रक्कम परत मिळवण्यास पोलिसांच्या पथकास यश आले.

 

दोन वर्षात दोन तपास अधिकारी…

फिर्यादी डॉक्टर यांची दोन वर्षे फसवणूक झाल्यानंतर दोन तपासी अधिकारी बदलले. त्यामुळे फिर्यादी यांनीही रक्कम पुन्हा परत मिळेल ही आशा सोडून दिली होती. मात्र पोलिसांनी उत्तर प्रदेशमध्ये जाऊन तळ ठोकत पोलिस मित्र दिपक बढे यांच्या साथीने तांत्रिक विश्लेषण करत आरोपीच्या मुसक्या आवळत तब्बल १८ लाख रुपये म्हणजेच सगळी रक्कम फिर्यादी यांना परत केल्याने डॉक्टर अमोल खोडदे, सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी तपास अधिकाऱ्यांचा सत्कार केला. सदरची कामगिरी सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलिस अंमलदार दीपक पवार, पोलिस मित्र दीपक बढे यांनी केली आहे.