शिरुर येथे तब्ब्ल 32 वर्षांनी न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची भरली शाळा

शिरूर तालुका

शिरुर (मुकुंद ढोबळे): थरथरते हात… चालण्यातही मंदपणा.. क्षीणन झालेले शरीर.. तर काही आजही तसेच…. ज्यांचे धपाटे पाठीत खाल्ले त्या धपाट्यांनी दिलेकी शिकवण…घेऊन 32 वर्षांनी त्याच गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करीत फुलांच्या पायघड्या … फुलांची पायावर उधळण करीत… चरण पूजन.. औक्षण करीत… विठ्ठलरुपी गुरुजनांना विठ्ठल रुक्माई ची मूर्ती ही भेट देऊन त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आज त्यांचा सत्कार पाहून एवढा मोठा सत्कार करत असताना गुरुजनांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या तर अनेकाना गहिवरून आले… अरेरे खूप केले आमच्यासाठी …उभ्या आयुष्यात एवढा सन्मान कोणी दिला नाही…तुमचा हा सन्मान आयुष्यभर लक्षात राहील असे म्हणत पाणवल्या डोळ्यांनी गुरुजनांनी विद्यार्थ्यांची पाठ कौतुकाने थोपटली.

शिरुर येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या 1984 ते 1990 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा व गुरुजन कृतज्ञता सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता. या गुरुजन कृतज्ञता मेळाव्यात रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील यांची रांगोळी काढण्यात आली होती.

शिरुरमधील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सन 1984 ते 1990 या काळामध्ये शिकत असलेल्या काही माजी विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आणि गुरुजनांचा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्याचे ठरवले. त्यासाठी शिरुरच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या कार्यालयातुन माजी विद्यार्थ्यांचे हजेरीपट घेऊन अ, ब आणि क या तीन तुकडीतील दहावीच्या सन 1990 च्या बॅचचे 135 ते 140 विद्यार्थ्यांची नावे सापडली. पण त्यांची पत्ते सापडणे अवघड होते. पाहता पाहता 120 विद्यार्थी विद्यार्थिनींचा शोध लागला. त्यांचे मोबाईल नंबर सापडले तर काहींची पत्तेही मिळाले. त्यानंतर त्या काळातील शिक्षकांची नावेही मिळाली.

त्यामुळे नावे मिळालेल्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचाही संपर्क सुरू होता. हॅलो सर मी तुमची विद्यार्थिनी बोलते …हॅलो सर मी तुमचा विद्यार्थी बोलतोय…रयत शिक्षण संस्थेचे 1984 ते 1990 चे विद्यार्थी हा हा बोला सर… आम्ही 13 नोव्हेंबरला शिरुरला सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शिक्षक कृतज्ञता मिळावा ठेवला आहे. तुम्ही तुमच्या पत्नीला घेऊन तुम्ही या… असा संवाद होताच अरे देवा तुम्ही 32 वर्षानंतर फोन करता आम्ही तुम्हाला आज नीटसे ओळखत नाही पण तुमच्या कार्यक्रमाला आम्ही नक्की येऊ अशा थरथरत्या आवाजात शिक्षकही प्रतिसाद देत होते. त्यांच्याकडून इतर शिक्षकांचे नंबर घेताना काही शिक्षक देवा घरी गेल्याची माजी विद्यार्थ्यांना समजले.

अखेर कार्यक्रमाचा दिवस उजाडला सकाळपासूनच कार्यक्रमाची लगबग विद्यार्थी करत असताना एक एक करता 26 गुरुजनांचा आगमन कार्यक्रम स्थळी झाले . सरांचा चहा-नाश्ता होताच मुख्य कार्यक्रमस्थळी घेऊन जाण्यासाठी विद्यार्थी आले होते. शिरुर येथील मयूर लॉन्स येथे हा गुरुजन कृतज्ञता सोहळा व विद्यार्थी स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी बत्तीस वर्षाच्या काळात दिवंगत झालेले गुरुजन व विद्यार्थी मित्र यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शालेय प्रार्थना, चरण पूजन,मनोगते यास विविध कार्यक्रम घेऊन गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

शाळेतील गुरुजनांनी मनोगत व्यक्त करताना पन्नाशीकडे झेप घेतलेल्या विद्यार्थ्यांनी व्यायाम, योगा चालणे, यास वाचनाची आवड ठेवावी त्यामुळे मन आणि शरीर दोन्हीही प्रफुल्लित राहते असा सल्लाही जाता जाता विद्यार्थ्यांना देऊन यापुढील आयुष्य निरोगी राहावे आशीर्वाद दिले.

यावेळी शिक्षकांनी शिकवलेले स्वप्न तंतुमयमूळ अमिबा, गणिताचे बाकोबा कोबाको, गुरुजनांचे डायलॉग, मारण्याची पद्धत, खेळांचे प्रकार, विद्यार्थ्यांनी केलेली धाडसी काम, रामलिंग यात्रेतील झांज पथक, कर्मवीर भाऊराव पाटील जयंती मिरवणूक, रयत शिक्षण संस्थेची वडाचे झाड अशी विविध रेखाटलेले चित्र यांनी जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लहानपणी आपण पाच पैसे दहा पैसे मागून तेथे असणाऱ्या दुकानातून घेतलेल्या लेमन गोळी, फेपरमेंट गोळी, दूध गोळी, किस मी पारले चॉकलेट, मिरची, विवीध गांधी यांच्या गोळ्या खास आकर्षण ठरले. तर सुग्रास नाश्ता,भोजन, टी याने कार्यक्रम आणखीनच सुंदर झाला.

सन 1990 दहावी वर्गाच्या वतीने शिरुर येथील न्यू इंग्लिश स्कूल यांना कायम लक्षात राहील अशी भेट देणार असल्याचे जाहीर केले. हा गुरुजन कृतज्ञता सोहळा व गेट-टुगेदर यशस्वी करण्यासाठी सुनील इंदलकर, स्वाती कर्डिले, प्रशांत शिंदे, अनुपमा कवितके, अनिल पोटावळे, संतोष मिरजकर, सचिन देशमुख, स्मिता रांजणे, अलका सरोदे, मुकुंद ढोबळे, योगेश मैड, संजय बरला, ज्योती ठोकळ, सुरेखा कर्डीले, संतोष चव्हाण, संतोष म्हेत्रे, डी एस पवार, सतीश बिरदवडे, जयदीप, सुरेंद्र नरवडे, रामकृष्ण पुंडे, भरत काळे, अनिल कोल्हे, अशोक जगताप, सविता ढमढेरे संजय कनिच्छे, राजेंद्र औटी, उल्हास साखरे यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे स्वागत स्वाती कर्डिले, प्रास्ताविक सुनिल इंदलकर, सूत्रसंचालन डी एस पवार, अनुपमा कवितके तर आभार सचिन देशमुख यांनी मानले.