आर्यन पुंडेच्या अपघातानंतर उपचारासाठी एकवटले विद्यार्थी व शिक्षक

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या आर्यन पुंडेचा शाळेत कब्बडीचा सराव करताना अपघात होऊन हात मोडला, आर्यनच्या वडिलांचे छत्र हरपलेले असल्याने त्याच्या आईवर बचत गटातून कर्ज काढण्याची वेळ आलेली असताना शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना ग्रामस्थांनी पुढाकार घेत आर्यनच्या उपचारासाठी हजारो रुपयांची मदत करुन आर्यनच्या आईला मदतीचा हात दिला आहे.

कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक शाळेत शिक्षण घेणारा आर्यन भरत पुंडे अतिशय हुशार मात्र त्याच्या वडिलांचे छत्र 10 वर्षांपूर्वीच हरपले असून आईने मोलमजुरी करुन आर्यनसह त्याच्या 2 बहिणींचा सांभाळ करत शिक्षण सुरु ठेवलेले आहे. सध्या शालेय क्रीडा स्पर्धा जाहीर झालेल्या असल्याने आर्यन शाळेच्या मैदानावर मित्रांसोबत कबड्डीचा सराव करत असताना हातावर पडला आणि त्याचा हात मोडला.

दरम्यान प्राचार्य अनिल शिंदे, क्रीडाशिक्षक ज्ञानेश्वर पुंडे, प्रकाश चव्हाण, चंद्रकांत धुमाळ यांनी आर्यनला उपचारासाठी शिक्रापूर येथील रक्षक हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याच्यावर उपचारासाठी 30 हजारांचा खर्च आल्याने आर्यनच्या आई लताबाई यांनी आर्यनच्या उपचारासाठी महिला बचत गटाकडून काही कर्ज घेतल्याचे प्राचार्य अनिल शिंदे व आर्यनचे वर्गशिक्षक सिताराम मोहिते यांना समजल्याने त्यांनी शाळेत आर्यनसाठी मदतीचे आवाहन त्यांनतर आर्यनच्या वर्गातील मित्र मैत्रिणी व शिक्षक यांनी 8 हजार रुपये मदत गोळा केली तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी 17 हजार रुपये मदत गोळा केली.

नुकतेच आर्यन ची आई लता पुंडे यांना शाळेत बोलावून घेत विद्या विकास मंडळाचे संचालक शहाजी दळवी यांच्या हस्ते सदर मदत त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. यावेळी मुलाच्या मदतीसाठी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांनी केलेली मदत स्विकारताना आर्यनची आई लता पुंडे यांच्या डोळ्यांत अश्रू तरारले होते.